Virat-Gautham interaction video goes viral : आयपीएल २०२४ मधील ३६ वा सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यापूर्वी आरसीबीचा स्टार फलंदाजी विराट कोहली आणि केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये विराट आणि गौतम गंभीर हे वादामुळे नेहमीच चर्चेत असणारी जोडी एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. दिल्लीच्या या दोन खेळाडूंमधील मैत्रीपूर्ण संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेक वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये विराट आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. आयपीएल २०२३ मध्ये या ठिणगीचे आगीत रूपांतर झाले होते. स्टेडियममध्ये झालेल्या शाब्दिक युद्धानंतर दोन्ही खेळाडूंना दंडही ठोठावण्यात आला होता. पण आता आयपीएल २०२४ मध्ये विराट आणि गंभीर मैदानात एकमेकांना मिठी मारताना दिसले. आता आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यापूर्वी व्हायरल व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर कोणी लिहिले, ‘ब्रदरहुड ऑन टॉप’ तर कोणी ‘दिल्ली बॉईज’ म्हणत दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आरसीबीची अवस्था बिकट आहे –

आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीची स्थिती खूपच वाईट दिसत आहे. या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, परंतु आरसीबीने केवळ एक सामना जिंकला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मात्र अनुभवी विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. या मोसमात त्याने शतकही झळकावले आहे. आता केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबी विजय मिळवून चाहत्यांना खूश करणार की त्यांच्या पदरी पुन्हा निराशा टाकणार, हे पाहावे लागेल.

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

केकेआरला दुसरे स्थान पटकावण्याची संधी –

कोलकाता संघाला गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात केकेआरने टेबल टॉपरला शानदार झुंज दिली होती. मात्र या रोमांचक सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जर केकेआर संघाने आरसीबी विरुद्धचा सामना जिंकला तर चांगल्या धावगतीमुळे ते गुणतक्त्यात दुसरे स्थान मजबूत करतील. कोलकाता संघ हा सामना आपल्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर खेळत आहे.