मुंबई : रोहित शर्माच्या गेल्या काही ‘आयपीएल’ सामन्यांतील निराशाजनक कामगिरीबाबत फारशी चिंता करण्याची आवश्यकता नसली, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे पाहता त्याने विश्रांती घेण्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. तो आता दमलेला दिसत असून याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले.

पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ३७ वर्षीय रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. सध्या तो ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील गेल्या पाचपैकी चार सामन्यांत तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून रोहित सातत्याने क्रिकेट खेळत आहे. ‘आयपीएल’पूर्वी तो इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला होता. या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने ‘आयपीएल’च्या सुरुवातीला सातत्याने धावा केल्या होत्या. मात्र, गेल्या काही सामन्यांत त्याला धावांसाठी झगडावे लागले आहे. सततच्या क्रिकेटमुळेच त्याला सर्वोत्तम कामगिरी करता येत नसल्याचे क्लार्कला वाटते.

हेही वाचा >>> भारताने सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे –लारा

‘‘गेल्या काही सामन्यांतील आपल्या कामगिरीने रोहित नक्कीच नाखूश असेल. त्याच्याकडून अपेक्षित खेळ होत नसल्याचे अन्य कोणी त्याला सांगायची गरज नाही. फलंदाज म्हणून आपल्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यात तो सक्षम आहे. त्याने यंदाच्या ‘आयपीएल’ची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर कामगिरीत सातत्य राखता न आल्याने तो निराश असेल. माझ्या मते, तो थोडा दमलेला दिसत असून त्याला विश्रांतीची गरज आहे,’’ असे क्लार्कने नमूद केले.

‘‘विश्रांतीचा रोहितला खूप फायदा होईल. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी तो ताजातवाना होऊ शकेल. मात्र, तो भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे त्याला विश्रांती घेणे थोडे अवघड जाईल. परंतु काहीही करून त्याला पुन्हा लय मिळवावी लागेल. भारतीय संघासाठी त्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे,’’ असेही क्लार्क म्हणाला. गेल्या आठवड्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रोहित प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) म्हणून खेळला होता. त्याने क्षेत्ररक्षण केले नव्हते. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु सोमवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला आणि नंतर फलंदाजी केली. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले असून फलंदाज म्हणूनही त्याला लवकर सूर गवसेल अशी क्लार्कला खात्री आहे.