‘उद्यापासून ८.१२ ची चर्चगेट लोकल ८.०७ ला सुटेल,’ स्टेशनवर घोषणा सुरू होती. स्वप्नीलने ती ऐकली आणि त्याच्या कपाळावर आठी उमटली. ‘बाप रे! म्हणजे उद्यापासून आपली चांगलीच तारांबळ होणार! आणखी किती लवकर निघायचे? रेल्वेवाल्यांना आमच्या वेळेची काही किंमतच नाही…..’ आणि असे अनेक विचार त्याच्या मनात सुरू झाले आणि त्यांचे रुपांतर हळू हळू रागात झाले. दुसऱ्या दिवसापासून आपल्या होणाऱ्या धावपळीच्या कल्पनेने त्याला आत्ताच घाम फुटला. संपूर्ण दिवसभर तो आपण घरातून किती वाजता निघायचे, मग त्यासाठी आपल्याला कसे खूप लवकर उठावे लागेल, झोप होणार नाही, इ. अनेक विचारांनी अस्वस्थ होता आणि नुसत्या कल्पनेनेच त्याला छातीत धडधडू लागले. श्वास गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि वाटले आपल्याला ही नोकरीच नको!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिसेंबर महिना सुरू झाला. आपला या ऑफिसमधला शेवटचा महिना.’ निवृत्त होऊ घातलेल्या श्यामरावांना एकीकडे खूप वाईट वाटत होते पण दुसरीकडे मनात एक प्रकारची उत्सुकता दाटून आली होती. आपल्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची उत्सुकता, विश्रांती घेण्याची इच्छा, पत्नीबरोबर बाहेरगावी जाण्याच्या योजना असे सारे मनात होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी निवृत्त होण्याची मानसिक तयारी चालवली होती. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू अशा अवस्थेत पण मनात एक समाधान घेऊन ते शेवटच्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडले.

हेही वाचा : खोबरेल तेलात ‘या’ तीन गोष्टी टाकून लावल्यास पांढरे केस होतील नैसर्गिकरीत्या काळे! डॉक्टर काय सांगतात, वाचा…

अश्विनीची बाळंतपणाची रजा संपून कामावर रुजू व्हायचा दिवस जवळ आला. तशी तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. ‘नकोच ती नोकरी. मूल महत्त्वाचे की नोकरी? आपण पुरेसा वेळ दिला नाही तर आपल्या मुलीवर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? मी सगळे करताना पिचून जाईन अगदी!’ तिला झोपच लागेना. सारखे रडू येऊ लागले. नको नको ते विचार मनात यायला लागले. आपण एक आई म्हणून अयशस्वी ठरू अशी भीती वाटू लागली. ‘आपल्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला, गाड्या लेट असल्या तर तिला पाळणाघारातून आणणे, तिच्या खाण्यापिण्याची सोय करणे नवऱ्याला जमेल का? लोक आपल्याला नावे नाही ना ठेवणार? आपली नोकरी फिरतीची. कधी बाहेरगावी जायची वेळ आली तर….?’

अशी अनेक स्थित्यंतरे आपल्या आयुष्यात घडत असतात. कधी छोटे छोटे बदल घडतात, तर कधी मोठ्या घटना घडतात. काही बदल अचानक तर काही अपेक्षित असतात. काही आकस्मिक घडतात तर काही हळूहळू होतात. कुठल्याही प्रकारचा बदल असला तरी त्याला तोंड द्यावे लागते. लहानपण संपवून किशोरावस्था प्राप्त होणे, स्त्रीच्या जीवनात गरोदरपण, बाळंतपण या सारख्या घटना आणि हळूहळू वार्धक्याकडे वाटचाल असे अनेक बदल आपल्या जीवनात विविध टप्प्यांवर होतात. चांगल्या आणि वाईट अनेक घटना घडतात. लग्नासारखी चांगली गोष्ट हे जीवनातील एक् महत्त्वाचे स्थित्यंतर पण तेही मनावर ताण निर्माण करते. नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी नवीन ठिकाणी जाणे, बढती मिळणे, नवीन घरात राहायला जाणे अशा अनेक आनंददायी बदलांमध्ये सुद्धा परिस्थितीशी जुळवून घेणे हे एक कसब ठरते. दुःखदायी घटनांना (उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी जाणे,परीक्षेत अपयश) तोंड देतानासुद्धा मनाची लवचिकता वाढवावी लागते. स्वप्नील किंवा अश्विनीसारख्या लोकांना छोट्या आणि मोठ्या बदलांना सामोरे जायला त्रास होतो. भूक वा झोप कमी होते, अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होतात. उदा. अपचन, पाठ दुखी, डोके दुखी, थकवा. मनात चिंता निर्माण होते किंवा उदासपणा येतो, निराश वाटते, आत्मविश्वास हरवतो. बऱ्याचवेळा बदल स्वीकारण्याची मानसिकता नसते. परिस्थितीमध्ये काही बदल होणारच नाही अशी खोटी समजूत मनाची करून घेतली जाते. बदलाला सामोरे जाण्याची योजना न करता जे घडले त्यावर अतिरेकी प्रतिक्रिया दिली जाते उदा. राग, संताप. चुकीच्या किंवा अर्धवट माहितीच्या आधारे निर्णय घेतले जातात. स्थिती पूर्ववत होईल अशी स्वतःची समजूत घालावीशी वाटते. यातून मानसिक व्यथा व विकार उद्भवतात.

हेही वाचा : नारळ पाणी रोज प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं का? वाचा तज्ज्ञांचं उत्तर…

वेगवेगळ्या स्थित्यंतरांना सामोरे जाण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले तर स्वतःच्या प्रगतीला आपण कारणीभूत होतो. खूप वेळा होणारा बदल आहे त्याच्यापेक्षा अधिक भयंकर आहे असे मन म्हणते आणि आपल्याकडे या बदलाला सामोरे जाण्याची पुरेशी ताकद नाही असे स्वतःविषयीचे चुकीचे मूल्यमापन करते. स्थित्यंतरे घडणार असे अपेक्षित धरले की आपोआप मनाची पूर्वतयारी होते. अशा वेळी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते. योग्य आहार, व्यायाम, ठरलेला दिनक्रम पार पाडणे, relaxation चे तंत्र आत्मसात करणे, योगाभ्यास, पुरेशी झोप या सगळ्यातून मन ताजेतवाने होते. दैनंदिन किंवा आठवड्याची डायरी लिहिण्याची सवय अशा वेळेस आपल्या मनातील विचार आणि भावना व्यक्त करायला मदत करते. विचारांची दिशा अधिक सकारात्मक करण्यासाठी अशा लिखाणाचा उपयोग होतो.

परिस्थितीचे नकारात्मक मूल्यमापन (बदलीच्या ठिकाणी काम जास्तच असणार). परिस्थिती भयंकर आहे असे वाटणे (बदलीच्या ठिकाणी मला काम जमणार नाही आणि वरिष्ठ माझ्यावर नाराजच होत राहतील), ‘असेच झाले पाहिजे किंवा असेच असायला हवे’ असे वाटणे (माझाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत), परिस्थितीवर माझे नेहेमीच नियंत्रण असले पाहिजे असे वाटणे अशा अनेक प्रकारच्या त्रुटी विचारांमध्ये तयार होतात. त्या दूर करण्यासाठी योग्य माहिती मिळवणे, वास्तविकतेचे भान ठेवणे, विविध पद्धतीने समस्या सोडवता येते याचे भान ठेवणे अशा अनेक मार्गांचा अवलंब केल्याचा फायदा होतो.

हेही वाचा : आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र; डॉक्टरांनी दिलेल्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

नेहमीच कुटुंब आणि मित्र परिवार यांच्याकडून भावनिक आधार, तसेच प्रत्यक्ष मदत मिळवणे (उदा. अश्विनीने आई-वडिलांची किंवा सासू-सासऱ्यांची मदत मागणे) याचा बदलत्या परिस्थितीशी सामना करताना खूप उपयोग होतो. काही वेळेस मात्र मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.

बदलाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन या गाण्यातून अगदी छान व्यक्त होतो.
बदला नजरा युं युं युं
सारा का सारा new new new
में happy-vappy क्यू क्यू क्यू
में busy-vizy हुं हुं हुं..
असे जर प्रत्येकाने म्हटले तर हसत हसत बदल स्वीकारणे सहज शक्य होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to face transitions in life and mental health hldc css