Masaba Gupta shares Her Lunch Plate On Instagram story: भारतीय आहारात पोळी हा एक मुख्य पदार्थ आहे. तुम्ही भाजी, वरण, चटणी, ठेचा आदी बऱ्याच पदार्थांबरोबर खाऊ शकता. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुमच्या गव्हाच्या पिठाच्या पोळीला उत्तम, आरोग्यदायी बनविण्याचा आणखीन एक पर्याय आमच्याकडे आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? हो… तर तुमच्या गव्हाच्या पिठात सातू व ज्वारी यांचे मिश्रण हा तुमच्यासाठी जेवणाचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता भारतीय फॅशन डिझायनर आहे. एप्रिल महिन्यात मसाबा गुप्ता व तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी ते दोघे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. आता मसाबा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती दुपारच्या जेवणात कोणत्या पौष्टिक पदार्थांचा स्वाद घेते हेसुद्धा सांगितलं आहे. तुम्ही पाहू शकता की, या फोटोमध्ये सातू व ज्वारीचे मिश्रण असणारी पोळी, मेथी चिकन, वांग्याचे भरीत, बूंदी रायता आदी पदार्थांचा समावेश आहे. सातू व ज्वारीचे मिश्रण असणारी पोळी खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांच्याबरोबर चर्चा केली आणि हे कॉम्बिनेशन खरोखरच कोणत्याही प्रकारच्या डाउन साइड्सशिवाय आरोग्य फायदे देऊ शकतात का हे समजून घेतलं. तर वेदिका प्रेमानी म्हणाल्या की, गव्हाच्या पोळीपेक्षा सातू, ज्वारी यांच्या मिश्रणाची पोळी हा आरोग्यदायी पर्याय आहे. सातू हा हरभरा म्हणजेच चण्यापासून बनवला जातो; जो ज्वारी, बाजरीबरोबर मिक्स करून खाल्ला जाऊ शकतो. तृणधान्य/बाजरी-डाळीचे मिश्रण, ज्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो ॲसिडचे प्रोफाइल असते. म्हणून सातू , ज्वारीची पोळी हा प्रथिनांचा चांगला स्रोत ठरतो.

हेही वाचा…Banana Leaves: अन्न शिजवताना, वाढताना केळीच्या पानांचा का केला जातो वापर? ‘हे’ तीन आजार दूर करण्यास होईल मदत; वाचा डॉक्टरांचे मत

सातू व ज्वारीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?

सुरुवातीला सातूचे आरोग्यदायी फायदे पाहू. सातू हरभरा म्हणजेच चण्याच्या डाळीपासून बनवला जातो; ज्यामुळे तो भारतीय आहारासाठी एक चांगला प्रथिनस्रोत ठरतो. हे आहारातील फायबर, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आदी खनिजांनी समृद्ध आहे. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास, स्नायूंची ताकद सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि हाडांच्या बळकटीलादेखील मदत होते.

आता ज्वारीचे आरोग्यदायी फायदे पाहू. ग्लुटेनमुक्त असलेले बाजरी, ज्वारी ही धान्ये फायबरनी समृद्ध आहेत. तसेच सातू हे धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी ओळखले जाते. हे पोटॅशियम, फॉस्फरस यांसारख्या खनिजांनीही समृद्ध आहे. तसेच ते हृदयाचे आरोग्य सुधारते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासही मदत होते, असे आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी म्हणाल्या..

या संयोजनाशी संबंधित कोणते आरोग्य धोके उदभवू शकतात का?

उत्तर : नाही… जर आहारातील फायबरचे इतर स्रोत जसे की, भाज्या किंवा इतर डाळी एकत्र केल्या तरीही त्याने बद्धकोष्ठता होऊ शकत नाही. तसेच हे संयोजन तुमच्या नियमित आहाराचा एक फायदेशीर भाग होऊ शकते, असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.