लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशात महायुतीमध्ये ११ जागांचा तिढा कायम आहे. तसंच भाजपाने काही ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार न देता आपले उमेदवार दिले आहेत. आजच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना भाजपाच्या दबावापुढे झुकावं लागत असल्याचं म्हटलं आहे. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. ज्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केलं होतं अशांची तिकिटं कापण्यात आली आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“ज्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केलं होतं, त्यांचं तिकिट कापण्यात आलं. अजून काही लोक आहेत ज्यांची तिकिटं कापली जाणार आहे. मग या लोकांनी त्यांच्यासह (भाजपा) जाऊन मिळवलं तरी काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. पक्षासह गद्दारी केली, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्यावेळेस म्हणाले होते एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन असं तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले होते. तेच आता उमेदवारांना तिकिटही देऊ शकत नाहीत. हे हाल मिंधे गटाचे झाले आहेत. आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत नक्की काय होणार? कारण एक एकेकाची विकेट पडताना दिसू लागली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

हे पण वाचा- “आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपा, मिंधे गट आणि राष्ट्रवादीची गद्दार गँग यांना उमेदवारच मिळत नाहीयेत. जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपा आणि मिंधे गटाला उमेदवारच मिळत नाहीत असं चित्र आहे.” अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आज संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीत कुठलाही तिढा नाही. मुंबईतली एक जागा राहिली आहे त्याबद्दल आमची चर्चा सुरु आहे. काँग्रेसला ती जागा लढवायची नसेल तर आम्ही तिथे लढवू आणि जिंकून येऊ. जेव्हा आघाडी असते तेव्हा जागांची अदलाबदल होतेच. बऱ्याच गोष्टींवर चर्चा होते. इंडियन एक्स्प्रेसने काल जो अहवाल समोर आणला आहे ती गोष्ट नवी नाही. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये नेत्यांना टाकलं जातं आणि उजळले की पक्षात घेतलं जातं. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. महाराष्ट्रात १२ लोक असे आहेत जे मोदींचे बारा वाजणार आहेत.

श्रीकांत शिंदेंवर बोचरी टीका

कल्याण मतदारसंघात पैशांची मस्ती असलेल्या उमेदवारांना वैशाली दरेकर ही एक सामान्य गृहिणी पराभूत करेल. कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला होता हे सगळ्यांना माहीत आहे. श्रीकांत शिंदे बच्चा आहे. आधी हिंमत असेल तर कल्याण आणि ठाण्यातली उमेदवारी जाहीर करुन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना दिलं आहे.