सोलापूर: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एसटी बस वाहकाने रागाच्या भरात चालकाच्या अंगावर मटणाच्या गरम रश्शाचे भांडे फेकल्याने त्यात चालक ३५ टक्के भाजून जखमी झाला. सोलापूर एसटी बस स्थानकात चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षात हा प्रकार घडला.

या घटनेतील दोघेही चालक आणि वाहक पुण्यातील स्वारगेट आगारातील आहेत. विश्रांती कक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक करण्यास कायदेशीर मनाई आहे. तेथे फक्त विश्रांती करता येते. परंतु नियम मोडून विश्रांती कक्षात मांसाहारी जेवणाचा स्वयंपाक केला जात होता. दरम्यान, या घटनेची दखल घेऊन सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे यांनी पुढील कारवाईसाठी पुण्याच्या स्वारगेट आगार प्रशासनाला अहवाल पाठवला आहे.

याबाबत एसटी चालक पिराजी बाबुराव गीते (वय ४१, रा. कासुर्डी, ता. भोर, जि. पुणे) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सहकारी वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार दोघेही चालक आणि वाहक रात्री एसटी बस स्थानकातील विश्रांती कक्षात मुक्कामी होते. त्यांनी रात्री विश्रांती कक्षात मांसाहारी जेवण तयार केले.

नंतर जेवणाची वेळ झाली असताना बाहेर गेलेला सहकारी वाहक हा उशिरा परत आला. त्यावेळी चालक पिराजी गीते यांनी, इतका वेळ कोठे गेला होता म्हणून विचारले.‌ त्यावरून दोघात वाद झाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण वाढले. त्यावेळी रागाच्या भरात वाहकाने चालक गीते यांच्या अंगावर मटणाचा गरम रस्सा असलेले भांडे फेकले. यात त्यांची छाती आणि पाठ भाजली. त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे शरीर ३५ टक्के भाजल्याचे दिसून आले.‌