अलिबाग – अलिबाग कोळीवाडयातील मच्‍छीमारांकडून मासळी घेवून त्‍यांना तब्‍बल दीड कोटी रूपयांचा गंडा घालणारया व्‍यापारयाला अलिबाग पोलीसांनी थरारक पाठलाग करून बेडया ठोकल्‍या आहेत. नायब मजिद सोलकर असे त्‍याचे नाव असून न्‍यायालयाने त्‍याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नायब सोलकर हा रत्‍नागिरी जिल्‍हयातील राजापूर तालुक्‍यातील नाटे गावचा रहिवासी आहे. घावूक मासे खरेदी करणारा व्‍यापारी असल्‍याचे भासवून त्‍याने अलिबाग कोळीवाडयातील मचछीमारांकडून आली मासळी खरेदी केली. मार्च २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्‍याने खरेदी केलेल्‍या मासळीची किंमत १ कोटी ५२ लाख रूपये इतकी आहे. मासे खरेदी केल्‍यानंतर तो पैसे देण्‍यास टाळाटाळ करू लागला. मच्‍छीमारांनी त्‍याच्‍याकडे पैशासाठी तगादा लावला परंतु तो काही पैसे देण्‍्याचे नाव घेईना. अखेर फसवणूक झालेले मिथुन लक्ष्मण सारंग , रणजित भगवान खमीस, प्रदोश गोरखनाथ तांडेल, विशाल हरिश्‍चंद्र बना यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्‍हा दाखल करून नायब याचा तपास सुरू केला.

गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ५ महिन्यापासून आरोपी नायब फरार होता. त्‍याने आपला मोबाईल देखील बंद ठेवला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवथरे व अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी,  विनीत चौधरी यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांचया सूचनेनुसार या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी करीत होते. सुर्यवंशी यांनी सायबर सेलच्‍या मदतीने तांत्रीक तपास करून माहीती प्राप्त घेतली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी आरोपी नायब हा मुंबई येथुन रत्नागिरी येथे जाणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. पोलीस पथकाने त्‍याच्‍या कारचा पाठलाग करून त्‍याला शिताफीने ताब्यात घेतले. नायब मजिद सोलकर याची चौकशी करून त्‍याला अटक करण्‍यात आली. त्‍याला न्‍यायालयासमोर हजर केले असता १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत. या गुन्‍हयाच्‍या तपासात हनुमंत सुर्यवंशी यांना हवालदार अतुल जाधव यांनी सहकार्य केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested for cheating fishermen of rs 1 5 crore amy