काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. थोरात हे नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत, अशीही चर्चा आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून त्यांनी कळवले आहे. या विषयावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत.” आज पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा निर्णय घेण्याची वेळ…”

पक्ष वाढविणे हे आमचेच कामच

“आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम; आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही”, अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

काँग्रेसने आत्मचिंतन करावे

बाळासाहेब थोरात यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बाळासाहेब थोरात यांच्याएवढ्या उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्कीच त्यांचा विचार केला असता किंवा त्यांवर चिंतन केले असते. मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावर विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

हे वाचा >> “मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!

सत्यजीत तांबे यांना आम्ही सहकार्य केले, पण

सत्यजीत तांबे यांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सत्यजीत तांबे यांनी भाजपात येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. एक युवक नेता विधानपरिषदेत येत असेल तर त्याला मदत केली पाहीजे. म्हणून सत्यजीत तांबे यांना स्थानिक पातळीवर भाजपाच्या सहकाऱ्यांनी मदत केली. याचा अर्थ आम्ही त्यांना काही ऑफर दिली आहे, असा होत नाही. पण सत्यजीत तांबे यांना कधी वाटले की, त्यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा आहे. तर भाजपा त्यांना कधीही प्रवेश देईल. सत्यजीत तांबेंसाठी आमचे दरवाजे उघडे असतील”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule reaction on congress leader balasaheb thorat joins bjp kvg
First published on: 07-02-2023 at 12:43 IST