केंद्रातल्या भाजपाच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेली भाजपा महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचं काम करते आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलंय नाना पटोलेंनी?

मागील काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणा-या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून शिंदे फडणवीसांचे जंगलराज सुरु आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात सरकार अस्तित्वात आहे का?

यानंतर नाना पटोले म्हणाले की, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था राज्यात सुरु आहे. राज्याच्या विविध भागातून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना जीवे मारण्याच्या धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या शहरांमधून तणावाच्या घटना घडत आहेत. सरकारच्या आशिर्वादाने सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असून जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मुकदर्शक होऊन पहात बसले आहेत तर गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत.

पुरोगामी महाराष्ट्रात असं कधीही घडलं नव्हतं

आता विरोधी पक्षांच्या नेत्यांना गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारविरोधात बोलणे बंद करा अन्यथा तुमचा दाभोळकर करू असे म्हटले जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे असे कधी घडले नव्हते. पण ज्या विचारांनी नरेंद्र दाभोलकर आणि क्रॉमेड पानसरेंना संपवले त्या विचारांचे लोक आता लोकशाही मानणा-या पुरोगामी विचारांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले आहे. या सरकारच्या अकार्यक्षमतेने सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. या सरकारला कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. आम्ही सत्तेत आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांवर २४ तासांत कठोर कारवाई करून त्यांना सुतासारखे सरळ करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole criticized eknath shinde and devendra fadnavis on threats to sharad pawar and sanjay raut scj