Dhananjay Munde on Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे चालू असलेल्या पक्षाच्या नव-संकल्प शिबीर – २०२५ या मंथन शिबिरास अनेक नेत्यांनी हजेरी लावत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या शिबिरास उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे त्यांच्याबरोबर उभा राहिलो आहे. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाआडून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे म्हणाले, “महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचे मला जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक अजित पवारांच्या कानाला लागून, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तूस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा ‘अभिमन्यु’ करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी ‘अर्जुन’ आहे! अजित पवारांनी आता बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं आहे. त्याचा मला जास्त आनंद आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणावरही केलं भाष्य

धनंजय मुंडे म्हणाले, “बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याची मनात खंत आहे”.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरीमध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हटले तर मी तिथे जाऊन मी काम करेन. पक्षालासुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही,

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde says mahayuti leaders campaigning against me santosh deshmukh murder case asc