रत्नागिरी : कोकणातील सागरी किनारपट्टीत परप्रांतिय मासेमारी बोटींची होणारी घुसखोरी आणि एलईडी द्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाकडून यावर ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी मत्स्य विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी प्रत्येकी दोन ड्रोन देण्यात आले आहे. या ड्रोनसाठी रत्नागिरीतील साखरीनाटे आणि भाट्ये या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी करण्यासाठी परप्रांतीय हायस्पीड नौकांची घुसखोरीचे प्रमाण जास्त वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्य विभागामार्फत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रात ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये आणि साखरीनाटे ही दोन केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. याचे उद्घाटन ९ रोजी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या ड्रोनद्वारे दररोज समुद्रातील हालचालींवर ६ तास नजर ठेवली जाणार आहे.

हेही वाचा…शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

राज्य शासनाने मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी या जिल्ह्यांत प्रत्येकी २ ड्रोन कॅमेरे दिले गेले आहेत. यासाठी पुण्यातील स्नेल कंपनीला कंत्राट दिले आहे. राज्यातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर पुर्वी पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जात होती. त्यात कालांतराने यांत्रिकीकरणाची भर पडली. गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टी क्षेत्रात परप्रांतिय हायस्पीड बोटींद्वारे घुसखोरी आणि पर्ससीन, एलईडीद्वारे अवैधरीत्या मासेमारीला सुरुवात झाली. त्यामुळे राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये आणि साखरीनाटे येथे प्रात्यक्षिकही घेण्यात आली होती. नौकांची ये-जा असलेल्या बंदरांची निवड ड्रोनसाठी करण्यात आली आहे. याचा आरंभ ९ जानेवारीला मुंबईत मत्य व बंदरमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी रत्नागिरी भाट्ये किनाऱ्यावरून ड्रोन सोडून त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या ड्रोनमुळे घुसखोरी आणि पर्ससिननेटद्वारे होणाऱ्या अनधिकृत मासेमारीलाही आळा बसणार आहे. गेल्या काही वर्षात रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारी भागात परप्रांतीय मच्छिमारांचे अतिक्रमण मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून गस्ती नौकाही भाड्याने घेण्यात आल्या आहेत. परंतु १२ नॉटीकल मैल अंत्तर असलेल्या समुद्रात एका नौकेद्वारे गस्त घालणे शक्य नाही, त्यामुळे ड्रोनचा उपयोग होणार आहे.

ड्रोन प्रणालीद्वारे राज्याच्या ७२० किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे १२ सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे म.सा.मा.नि. १९८१ (सुधारीत २०२१) व्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता वापर करण्यात येणार आहे. सदरच्या ड्रोन प्रणालीद्वारे अनाधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेबसोलूशन/स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा…Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…

राज्यातील ७ सागरी जिल्ह्यांकरीता एकुण ९ ड्रोनची (शिरगांव-पालघर (१ नग), उत्तन- ठाणे (१ नग), गोराई-मुंबई उपनगर (१ नग), ससुनडॉक-मुंबई शहर (१ नग), रेवदांड व श्रीवर्धन रायगड (२ नग), मिरकरवाडा व साखरीनाटे रत्नागिरी (२ नग) आणि देवगड-सिंधुदुर्ग (१ नग)) सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकणार आहे.

रत्नागिरी आणि साखरीनाटे येथे सर्वाधिक नौका असल्यामुळे या २ बंदरांची निवड केली आहे. या ड्रोनद्वारे एका दिवसात ६ तास नजर ठेवली जाणार आहे. तसेच रत्नागिरीतील कोणत्याही बंदरातून ड्रोन कॅमेरा आकाशात सोडला जाईल. यामुळे सुरक्षेसह अनधिकृत मासेमारील आळा बसणार आहे.आनंद पालव, प्रभारी सहाय्य मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fisheries department monitor konkan coast through drones to prevent intrusion of foreign fishing boats and led fishing sud 02