“मी काही अमोल किर्तीकर यांच्या विरोधात नाही, मी पक्ष सोडू नये असं माझ्या कुटुंबाचं मत होतं”, असं वक्तव्य मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले कीर्तिकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा मूळ विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळेच मी त्यांना समर्थन दिलं आहे.” गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी विदीशा कीर्तिकर यांनी पतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “आम्हाला त्यांचा (गजानन कीर्तिकर) निर्णय पटलेला नाही. आम्ही कुटुंब म्हणून त्यांना असा निर्णय घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही.” पत्नी विदीशा यांच्या या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गजानन कीर्तिकर म्हणले, “मी अमोलच्या विरोधात नाही. माझ्या कुटुंबाचं म्हणणं होतं की मी पक्ष सोडायला नको होता. अमोलचं आणि माझ्या पत्नीसह इतरांचंही हेच मत होतं. माझ्या दोन्ही मुली आणि सुनेलाही वाटत होतं की पक्ष सोडू नये. तरीही एका विशिष्ट कारणासाठी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. तसा दृढनिश्चय करूनच मी शिंदे गटात दाखल झालो. माझ्यावर ईडीचा (अंमलबजावणी संचालनालय) किंवा इतर कुठल्या तपास यंत्रणेचा आरोप नव्हता, तसेच खोक्यांचाही प्रश्न नव्हता. केवळ या शिवसेनेची (उबाठा गट) वाटचाल ज्या पद्धतीने चालू होती ती भविष्यात शिवसेनेलाच त्रासदायक ठरणार होती हा विचार करून मी एकनाथ शिंदे यांच्या मागे उभा राहिलो आणि त्यांच्या नेतृत्वात काम करू लागलो.”

विदीशा कीर्तिकर म्हणाल्या होत्या, “मी त्यांना (गजानन कीर्तिकर) म्हणाले होते की तुम्ही हा निर्णय (शिंदे गटात जाण्याचा निर्णय) घ्यायला नको होता. हा शिंदे आमच्याकडे अनेकदा यायचा. मी कीर्तिकरांना म्हणाले होते, तो (एकनाथ शिंदे) तुमच्यापेक्षा लहान आहे. आता तुम्ही त्याला सलाम ठोकणार हे काही मला पटलेलं नाही. मला ते बरं वाटत नाही. मी त्यांच्या निर्णयाला विरोध केला तरी त्याने काही फरक पडला नाही.” पत्नीच्या या वक्तव्यावरही खासदार कीर्तिकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> Pune Porsche Crash : काँग्रेसकडून न्यायिक चौकशीची मागणी, आरोपीचा ‘तो’ VIDEO पोस्ट करत विचारले ५ महत्त्वाचे प्रश्न

खासदार कीर्तिकर म्हणाले, मी ५७ वर्षांपासून शिवसेनेत आहे. सुरुवातीची ४५ वर्षे मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. बाळासाहेबांनंतर अनेक वर्षे मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. उद्धव ठाकरे देखील वयाने माझ्यापेक्षा लहानच आहेत. मला त्यांचे आदेशही पाळायला लागत होते. कारण पक्षाची शिस्त असते आणि ती शिस्त पाळावीच लागते.