राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, त्याची चौकशी करून जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांना एक कोटी रुपयाची लाच ऑफर केल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस आणि त्या संबंधित परिवाराशी जुने संबंध असून, फडणवीस मुख्यमंत्री असतानापासूनचे त्यांचे संबंध आहेत. सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा आणि ज्यांच्यावर ब्लॅकमेल केलेल्या आरोप केला आहे, त्या कुटुंबाचा संबंध होता, असे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगत आहेत. यामागे काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी व वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका : नाना पटोले

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा वसई-विरार येथे १८ आणि १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान करून लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही, महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो, असेही पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the home minister of the state is not safe how is the people safe says nana patole vrd