Kishori Pednekar on Raj Thackeray Devendra Fadnavis alleged Meeting : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. अशातच सर्वांना चकीत करणारी एक बातमी समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात आज (१२ जून) एक मोठी घटना घडली आहे. मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एंड या हॉटेलमध्ये राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वांद्रे येथील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये दाखल झाले होते. पाठोपाठ राज ठाकरे देखील या हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटले की नाही, त्यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. परंतु, दोन्ही नेते एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये पोहोचणं हा योगायोग आहे की राजकीय भेट आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच या कथित भेटीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत.
राज ठाकरेंनी पहिला चेंडू टाकला, आम्हीही प्रतिसाद दिला : पेडणेकर
शिवसेना (ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाला या विषयावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ही भेट नेमकी कशासाठी झाली आहे ते समजत नाही तोवर याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस कोणत्या कारणासाठी भेटले आहेत ते माहिती नसताना त्यावर वक्तव्य करणं घाईचं ठरेल. कारण सर्वच नेत्यांनी सांगितलं आहे की आपली विश्वासार्हता कायम राहिली पाहिजे. अलीकडेच मनसे-शिवसेना (ठाकरे) एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांनी पहिला चेंडू टाकला होता. महाराष्ट्रासमोर आमची भांडणं क्षुल्लक आहेत असं ते म्हणाले होते. त्यावर आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील तसाच प्रतिसाद दिला. आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रहितासाठी आम्ही आमच्यातील भांडणं मिटवायला तयार आहोत”.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे यांची एसंशि गटाबरोबर (एकनाथ शिंदे यांची शिवसेना) भांडणं नाहीत, तसेच भाजपाबरोबरही भांडणं नाहीत. मात्र महाराष्ट्राच्या मूळावर उठलेल्या लोकांबरोबर राज ठाकरे जाणार नाहीत. तसेच आमच्या (शिवसेना उबाठा व मनसे) ९५ टक्के कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आहे. त्यामुळे राज-फडणवीस भेटीबद्दल आत्ता काही बोलणं उचित नाही. अशी भेट होत असेल तर होऊ द्या. त्यातून काही घडलं तर बघू”.