Maharashtra Politics Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवस झाले तरी अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल देऊनही महायुती सत्तास्थापनेचा दावा करू शकलेली नाही. आधी मुख्यमंत्रीपद व आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष भाजपा व शिवसेनेत (शिंदे) रस्सीखेच चालू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते मिळावे, या मागणीवर ते ठाम असून भाजपाची त्यास तयारी नाही. त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खाते कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल. यासह महायुतीत खातेवाटपावरही चर्चा होऊ शकते. दिवसभरात घडणाऱ्या या सर्व राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Breaking News highlights : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
बांगलादेश कॅनडातील हिंदूंवरील हल्ल्यांना मोदी जबाबदार, संजय राऊतांचा आरोप
संजय राऊत म्हणाले, भारतातील निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाने समाजांमध्ये ठिणगी टाकण्याचं काम केलं. त्याचे परिणाम जगभरातील हिंदूंवर होत आहेत. नेपाळ, कॅनडा, बांगलादेश व पाकिस्तान या देशांमध्ये हिंदूंना त्रास दिला जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंची जीवितहानी चालू आहे. याला केवळ मोदींची धोरणं कारणीभूत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी भारतातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी व भाजपाने देशभरातील मुस्लिमांना टार्गेट केलं. प्रार्थना स्थळांचं खोदकाम करायला प्रोत्साहन दिलं. त्याचा उलटा परिणाम हिंदूंवर झाला. इतर देशातील हिंदूंना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. इतर देशांमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही. बांगलादेशमध्ये जाऊन तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार, हल्ले थांबवण्याची ताकद मोदी किंवा भाजपाच्या सरकारमध्ये नाही.