Raj Thackeray On Ladki Bahin Yojna : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच नेत्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. तसेच ‘उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या कोणत्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“माझ्या राजकारणाला १९८९ साली सुरुवात झाली. १९९२ साली मी नागपूमध्ये एक मोठा मोर्चा काढला होता. १९९२ हा काळ सर्वांना खडबडून जागा करणारा होता. त्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा मी विदर्भात खूप वेळ असायचो. अमरावती, यवतमाळ इकडे मी फिरत असायचो. अमरावती तर माझं घर झालं होतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी इकडे नवीन नाही. या ठिकाणचे सर्व विषय मला माहिती आहे. प्रश्न देखील माहिती आहेत. मात्र, मला वाईट हे वाटतं की अजूनही तेच प्रश्न आहेत. प्रश्न बदलले नाहीत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टीका; महायुतीतील वाद चव्हाट्यावर!
“यवतमाळ जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हटलं जातं. कापसावरून हा जिल्हा श्रीमंत असायला पाहिजे होता. पण हा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत एवढे सरकार आले आणि गेले. मग एवढे सरकार येऊन गेले आणि आपण त्यांना कधीही विचारात नाहीत. मी तुम्हाला एवढं विचारायला आलो आहे की, गेल्या पाच वर्षात काय-काय राजकारण झालं? मग तु्म्ही मतदार म्हणून कधी विचार करता की नाही? मग त्याच त्याच माणसांसाठी तुम्ही मतदान करणार असाल तर तुमचं तुम्हाला लखलाभ”, असंही राज ठाकरे म्हणाले.
“आता सर्वजण येतील आणि पैसे फेकतील. आम्ही लाचार, या राज्यात कितीतरी मतदारसंघ असे आहेत की, आपण दिलेलं मत हे सध्या कुठे फिरतंय हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही त्यांना निवडून द्यायचं आणि ती माणसं विकली जाणार, मग आम्ही हे सर्व पाहात राहाणार. मला अशा लोकांचं नेतृत्व करायचं नाही. ज्यांना राग येत नाही, ज्यांना चिड येत नाही. ज्यांना स्वाभिमान नाही, अशा लोकांचं नेतृत्व मला करायचं नाही. यवतमाळ जिल्ह्यातले आतापर्यंत दोन मुख्यमंत्री होऊन गेले. मग तरीही यवतमाळ जिल्ह्याने आत्महत्याग्रस्त म्हणून काय ठेका घेतलाय का? तुम्ही जो पर्यंत दुसऱ्या लोकांना निवडून देत नाही. तो पर्यंत हे बदलणार नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्राला माझी हाक आहे. माझ्या राज्याबाबत माझे काही स्वप्न आहेत. २०१४ ला राजकीय आराखडा मांडणारा मनसे हा पहिला राजकीय पक्ष आहे. यातून आपल्या राज्याची आस्था लक्षात येते. आज आम्हाला जाती-पातीमध्ये गुंतवलं जातंय. याआधाही जातीपाती होत्या. पण गेल्या काही वर्षांत आमच्याकडे एक संत जन्माला आले शरद पवार आणि त्यांनी हे सर्व विष पेरलं”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
‘फुकट काहीही मिळणार नाही’
“जातीपातीच्या पलिकडे माझे तरुण आणि तरुणी मोठे झाले पाहिजेत. आज लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला काही पैसे मिळाले असतील. काही महिलांना मिळाले असतील किंवा काहींना मिळालेही नसतील. मात्र, यामधून काहीही हाताला लागणार नाही. उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कोणत्याही मिळणार नाहीत. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत. त्यांच्या हाताला काम मिळेल आणि सक्षण करण्याचं काम मी करेन. राज्यातील प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे. पण सर्व बांजूनी आपला सत्यनाश होतो आहे. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd