कुख्यात दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारंवार दाऊदचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहेत. गुन्हेगारांशी संबंध असलेल्या मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा भाजपाने दिला होता. दुसरीकडे, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून सत्ताधारी महाविकास आघाडी भाजपाला प्रत्युत्तर देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्या प्रसिद्ध असलेल्या पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा आधार घेत भाजपावर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ‘श्रीवल्ली’च्या चालीवर गाणं गात भाजपाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी –

नज़रें मिलते ही नज़रों से
नज़रों को चुराये
कैसी ये हया तेरी
जो तू पलकों को झुकाये
दाऊद जो गुंडा है, उसको निहारे तू (भाजपावाल्यांनी दाऊदचे फोटो फिरवले)
और जो गरवीदा है उसको टाले तू
तेरी झलक बीजेपी ये कैसी, नैनोमेसे उतरी
तेरी झलक बीजेपी ये कैसी, बाते करे तू नकली

“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून फक्त धमक्या दिल्या जात असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. विधानभवनात माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. सरकारी नोकराला अटक झाली, की २४ तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांच्याकडची खाती तरी काढून घेण्यात यावीत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. “तुम्ही वारंवार आरोप करत आहात की भाजपा यंत्रणा वापरते. पण आता कोर्टानंच जामीन नाकारला. तुमचे ते खूप लाडके असतील, दाऊदचा दबाव असेल, तर किमान खाती तरी काढून घ्या. गेल्या २० दिवसांत त्यांच्या खात्याच्या फाईल्स कोण सह्या करतंय हा मला प्रश्न आहे. की जेलमध्ये पाठवता तुम्ही सह्या करायला? त्यांच्या विभागाला कुलूप ठोकलं का?” असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“नैतिकता लांब, हा व्यवहार आहे. न टिकणाऱ्या केसेस दरेकर, प्रसाद लाड, बावनकुळेंवर लावायच्या. पण जी कोर्टात टिकली आहे, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही. दाऊदचा दबाव असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे. तो बिचारा घाबरतो इथे यायला आणि हे त्याला घाबरतायत”, असा खोचक टोला पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp amol mitkari on bjp dawood pushpa srivalli song sgy