भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून याच मुद्द्यावर भाजपावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून पंकजा मुंडे नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता स्वतः पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर भाषण करताना या घडामोडींवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच सर्व माध्यमांना बोलावेल आणि समोर बसून बिनधास्त भूमिका जाहीर करेन. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.”

“मी गोपीनाथ मुंडेंएवढी मोठी नाही म्हणतात”

“पंकजा मुंडेचं महात्म्य सांगितलं जातं, कमीपणा सांगितला जातो. मी गोपीनाथ मुंडेंएवढी मोठी नाही म्हणतात. हो, बरोबर आहे. मला गोपीनाथ मुंडेंसारखं म्हणता तेही बरोबर आहे. गोपीनाथ मुंढेंपेक्षा पुढे जाल असा आशीर्वाद देता तेही मी नम्रपणे स्वीकारते,” अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

“अनेक लोक निवडणूक हरले, मात्र त्यांना संधी दिली गेली”

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “मी राजकारणात जी भूमिका घेईन, ती छातीठोकपणे घेईन. मी आज ३ जून २०२३ पर्यंत ज्या भूमिका जाहीरपणे मांडल्या त्याच भूमिकेंशी मी ठाम आहे. विरोधकांना किंवा माध्यमांना संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोक निवडणूक हरले, मात्र त्यांना संधी दिली गेली. गेल्या चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झालेत. त्याला मी पात्र होत नसेल तर लोक चर्चा करणारच. ती चर्चा मी ओढावलेली नाही.”

हेही वाचा : “पक्ष माझा नाही” वक्तव्यावरून पक्षांतराच्या चर्चांना उधाण, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही लोक…”

“मी अमित शाहांची भेट घेणार”

“असं असलं तरी माझ्या मनात गाढ विश्वास आहे. अमित शाह माझे नेते आहेत. मी अमित शाहांची भेट घेणार आहे. मी त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. मी त्यांच्याशी मनमोकळं बोलणार आहे,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde comment on current politics bjp speculations pbs