लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी दोन दिवस बंद असणार आहे. महादरवाज्याजवळ उंच कड्यावर असलेले मोकळे दगड काढून टाकण्याचे काम दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजने आंतर्गत काढून टाकले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे बंदी आदेश जारी केले आहेत.

रायगड किल्ल्यावर महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेण्याकरीता दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शविली असून हे काम २३ मे आणि २४ में या कालावधीत केले जाणार आहे. हे काम करत असतांना, हटवण्यात येणारे दगड, गोटे आणि मातीचे ढिगारे रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावरही जाण्याची शक्यता आहे. हीबाब लक्षात घेऊन संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या आंतर्गत किल्ले रायगडावरील पायवाट बंद ठेवली जाणार आहे.

आणखी वाचा-ठाणे, मिरजेत घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक, १७ लाखाचे दागिने हस्तगत

या ठिकाणी असलेला कडा हा अतिउंच असल्याने यासाठी प्रशिक्षित रॅपलर्सची मदत घेतली जाणार आहे. दोन दिवसात टप्प्याटप्प्याने सर्व सैल झालेले दगड हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत पर्यटक, स्थानिक नागरीकांनी गडावर पायवाटेने गड चढ-उतार करू नये असे आदेश प्रशासनाने जारी केले आहे.

येत्या ६ जूल रोजी तारखेनुसार आणि २० जून रोजी तिथी नुसार किल्ले ३५१ वा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. हीबाब लक्षात घेऊन आधीच धोकादायक दगडं हटविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पायवाट मार्ग पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.