Sanjay Raut On Ajit Pawar Meeting with Amit Shah : देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे लोक मोठे कलाकार असून यांनी राजकारणात येऊन आपल्या नाट्यसृष्टीचं मोठ नुकसान केलं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीवरून केंद्र सरकारवरही टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना अजित पवारांनी दिल्लीत अनौपचारिक बैठकीत अमित शहांच्या भेटीबाबत केलेल्या खुलाशांच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
भाजपाचं महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरु होतं, हे हळू हळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. श्रीराम लागूंपासून ते आताच्या प्रशांत दामलेंपर्यंत असे मोठे कलाकार महाराष्ट्राच्या रंगमंचाने दिले आहेत. आपल्या राज्याला नाट्यश्रृष्टीची मोठी परंपरा आहे. मात्र, या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यांनाही नाट्यसृष्टीत सामावून घेतलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
हे तिन्ही लोकं उत्तमपणे मेकअप करतात. त्यांचे चेहरे बदलतात. अजित पवार हे एका गुप्तहेराप्रमाणे नाव आणि चेहरा बदलून, खोट्या मिशा लाऊन दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रात्री वेश बदलून रस्त्यावरच्या दिव्या खाली बसून सरकार कसं पाडायचं, यावर चर्चा करत होते. ही फार मोठी गोष्ट आहे. हे लोक मोठे कलाकार आहेत. यांनी राजकारणात येऊन आपल्या नाट्यसृष्टीचं मोठ नुकसान केलं आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
नीती आयोगाच्या बैठकीवरून मोदी सरकारवर टीका
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी नीती आयोगाच्या बैठकीवरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं. पंडित नेहरुंनी नियोजन आयोगाची स्थापना केली होती. त्याचं नाव बदलून भाजपाने निती आयोग असं केलं. देशाच्या विकासकामांसाठी धोरण बनवणं हे या आयोगाचे मुख्य काम आहे. मात्र, यंदा मोदी सरकारने ज्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला आहे, त्याप्रमाणेच नीती आयोग काम करत आहे. मोदी सरकारने केवळ भाजपाशासित राज्यांना निधी दिला आहे. त्यामुळेच विरोधकांनी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. केवळ ममता बॅनर्जी या बैठकीला हजर होत्या. मात्र, त्यांनाही या बैठकीत बोलू दिलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
© IE Online Media Services (P) Ltd