एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्ष देखील गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेचे सगळे मंत्री एकनाथ शिंदेंसोबत आसाममध्ये आहेत. त्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी पक्षांकडून मात्र सरकार टिकणार असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली भेटीसाठी आज दुपारी रवाना झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विमानतळावर उतरताच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सूचक विधान केलं आहे. शरद पवारांनीच अशा प्रकारचं विधान केल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज शिवसेनेच्या गोटाला अजून एक मोठा धक्का बसला असून उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील गुवाहाटी गाठली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता सर्व मंत्री आणि बहुतांश आमदार हे गुवाहाटीत एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीमध्ये त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी आग्रही भूमिका आमदारांनी मांडल्याची माहिती टीव्ही ९ नं दिली आहे. त्यात १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आल्यामुळे हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!

दरम्यान, एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. बिगर भाजपा पक्षांचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचं पवारांनी सांगितलं असलं, तरी त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांनी आता पुढाकार घेतल्याचं त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होत असलं, तरी विमानतळावर त्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे संभ्रम वाढू लागला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार विमानतळावर उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला गेलेले आमदार परत येतील, असं पवार म्हणाले आहेत. “आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना आहे. मला विश्वास आहे की त्यांचे काही आमदार आसामला गेले आहेत, ते जेव्हा परत येतील. त्यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Video : “तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा किंवा भ**, पण हिशोब तर द्यावा लागेल”, किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका!

दिल्लीत कुणाच्या भेटीगाठी?

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चा सुरू झालेली असताना पवारांनीच आपल्या दिल्ली भेटीचं कारण सांगितलं आहे. “मी दिल्लीत कुणालाही भेटणार नाही. आमची संसदेच एक बैठक आहे. बिगर भाजपा पक्षांच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज आम्हाला भरायचा आहे. त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. इतरही बिगरभाजपा पक्षांचे नेते इथे येतील. अखिलेश यादव देखील येत आहेत. उद्या सकाळी ११.३० वाजता संसदेत आम्ही यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरू”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on eknath shinde rebel mla group cm uddhav thackeray shivsena pmw
First published on: 26-06-2022 at 17:38 IST