सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी कर्जमाफी, ड्रग्ज प्रकरण, नीट परीक्षा, महागाई, बेरोजगारी यासह अनेक मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी माझ्याशी बोलताना शिवीगाळ केल्याचं म्हटलं आहे. तसेच अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलं. याबरोबरच अंबादास दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रसाद लाड राजीनामा देणार असतील तर मीही राजीनामा देतो”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : “कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?

अंबादास दानवे काय म्हणाले?

“त्यांनी (प्रसाद लाड) सभापतींशी बोललं पाहिजे. माझ्याशी बोलण्याचा काही संबंध नाही. कारण मी त्यांना नाही तर सभापतींना प्रश्न विचारला होता. त्यांनी माझ्याकडे हातवारे करून व्यक्तिगत विरोधीपक्ष नेत्यांनी हे करा, ते करा, अशा पद्धतीने ते बोलत होते. प्रसाद लाड हे कोण आहेत? ते हिंदुत्ववादी आहेत का? ते मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर हिंदुत्वाचे ७० ते ८० गुन्हे आहेत. हे लोक मला हिंदुत्व शिकवणार का? त्यामुळे माझ्यामधील शिवसैनिक जागा झाला”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

दानवे पुढे म्हणाले, “मग मी डायसवरून बाजूला होऊन बोललो. समोर असते तर हातापायी झाली असती. कारण ते व्यक्तिगत घेत होते, तर मलाही व्यक्तिगत घेतलं पाहिजे ना? काय बोलावं आणि काय नाही, ते काय माझे मालक आहेत का? मला त्यांनी निवडून दिलं का? माझा राजीनामा माझ्या पक्षाचे नेते पाहतील. हे कोण आहेत माझा राजीनामा विचारणारे. राजीनामा द्यावा असं ते बोलले. मग तेही मला बोलले आहेत. त्यांनीही राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत असतील तर मी देखील राजीनामा देतो”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group leader ambadas danve on opposition leader post resignation and monsoon session prasad lad gkt
Show comments