‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तीन दिवस कार्यकर्ते, नेतेमंडळींनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतले. मात्र, यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. तसेच, पुस्तकातील उद्धव ठाकरेंबाबतच्या उल्लेखाबाबतही उपहासात्मक भाष्य केलं आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
गुरुवारी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांच्या पुस्तकातला उल्लेख वाचून दाखवला. “शरद पवारांनी पुस्तकात लिहिलंय की ‘राज्यातील घडामोडींची बितंबातमी उद्धव ठाकरेंकडे नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव टाकरेंना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचं कुठे काय घडतंय याकडे बारीक लक्ष नसे. उद्या काय घडेल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती जी नव्हती. काय पावलं उचलावी लागतील, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती’ असं शरद पवार पुस्तकात म्हणत आहेत”, असा उल्लेख करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचलं तर १०० असे उल्लेख आहेत ज्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक आहे. याला ‘सिलेक्टिव्ह अॅम्नेशिया’ असं म्हणतात. तो त्यांना सातत्याने होतो. पूर्ण अभ्यास करायचा नाही. कुणीतरी नोट्स काढून दिलेल्या असतात, तेवढ्या आपल्या वाचून दाखवायच्या. दरवेळी माणूस त्यावर पास होत नाही. पूर्ण पुस्तक वाचायचं असतं”, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी दिला आहे.
लोकसभेसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे गटाकडे किती जागा? संजय राऊत म्हणतात…!
शरद पवार आणि टीआरपी!
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना शरद पवारांना टीआरपी कसा घ्यायचा हे समजतं, अशा आशयाची टिप्पणी केली होती. “एक गोष्ट तर महाराष्ट्रात मला लक्षातच आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा त्याचंही आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा परत घेईन. मग मीच माझ्या जागी परत येईन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
यावर सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात उत्तर देताना “टीआरपी कसा वाढवायचा असेल तो शरद पवारांकडून शिका असं ते पूर्ण म्हणाले आहेत”, अशी प्रतिक्रिया दिली.