गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे आमने-सामने आल्या आहेत. एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं. यावर शालिनी ठाकरेंनी पत्र लिहून सुषमा अंधारेंना इशारा दिला. संबंध नसताना जर राज ठाकरेंच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शालिनी ठाकरेंच्या या इशाऱ्यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. शालिनी ठाकरेंचं वक्तव्य ‘चीप पब्लिसिटी’चा प्रकार आहे. त्यावर मला बोलायचं नाही. पण त्यांना फार इच्छा आणि हौस असेल तर त्यांनी दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवावं. माझी तिथे निशस्त्र जायची तयारी आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

शालिनी ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाले, “या बाई नेमक्या कोण आहेत? हे मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. मी अशा बिनमहत्त्वाच्या लोकांबद्दल अजिबात बोलत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगते, डीजे असेल किंवा लेझर असेल, याच्याविरोधात आम्ही दहा वर्षांपासून लिहितोय, बोलतोय. त्यामुळे तो आता मुद्दाच नाही. उगीच कोणताही कशाला संबध जोडायचा आणि आम्हाला तुम्ही बोललात म्हणायचं. उगीच काहीतरी अर्थ जोडण्यात काहीही अर्थ नाही. ठाणे, नांदेड आणि संभाजीनगरमध्ये जे मृत्यूचं तांडव सुरू आहे, त्यावर आम्ही प्रश्न विचारत आहोत, हाच आमचा मुद्दा आहे.”

हेही वाचा- “राज ठाकरेंच्या नातवाला जर तुम्ही…”, शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा; म्हणाल्या, “तुम्ही नैराश्येत आहात!”

“यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक हे उपकंत्राटदार नेहमीच लुडबूड करतात. आता तुम्ही ज्यांचं नाव (शालिनी ठाकरे) घेतलं, तो चीप पब्लिसिटीचा प्रकार आहेत. त्यावर मला बोलायचं नाही. पण त्यांनी जाळ, गुरगुरले, भडकले, डरकाळी असे शब्द वापरले. मला खरंच अशा भानगडीत पडायची इच्छा होत नाही. तरीही त्यांची फार इच्छा आणि हौस असेल तर दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवा. माझी तिथे निशस्त्र यायची तयारी आहे,” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare on mns leader shalini thackeray dj in ganeshotsav rmm