काँग्रेस पक्ष हा गंजलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे. काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या टीकेला ठाकरे गटाकडून सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता ठाकरे गटाच्या प्रत्युत्तरावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीटद्वारे पलटवार केला आहे. चर्चेत राहण्यासाठी तुमच्या सारखी ‘वेस्ट’ बडबड करण्याची कोणाला आवड आणि गरज दोन्ही नाहीये, असं केशव उपाध्ये म्हणाले.
ठाकरे गटाने काय म्हटलं?
काँग्रेस हा पक्ष गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया कंपनी जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
हेही वाचा >> “काँग्रेस हे गंजलेलं लोखंड, तर भाजपा…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
केशव उपाध्ये यांचा पलटवार काय?
६० वर्षे देशावर सत्ता असताना, हवी तशी लूटमार, भ्रष्टाचार करून स्वतःची पोटं भरणाऱ्या काँग्रेसच्या ‘टेस्ट इंडिया कंपनीला’ २०१४ साली जनतेनं बाजूला फेकून दिलं. आज १० वर्षे भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्यामुळे,
◾️११ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे.
◾️जगाचा आर्थिक विकास दर २.७ टक्के असताना भारताचा सर्वाधिक ७.८ टक्के आहे.
◾️विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे
◾️१५ हजार किलोमीटरचे नवीन रस्ते झाले आहेत.
◾️१० कोटी गरीब लोकांना आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार करता येत आहेत
◾️८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे
◾️कोरोनाच्या महामारीत मोफत लसीकरण करून २७ देशांना लस पुरवली आहे
◾️करोडो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत केली आहे.
आणि अशा विविध योजनांमधून कोट्यवधी शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार यांचे राहणीमान उंचावले आहे. काँग्रेसचा नव्याने आलेला एवढा पुळका दाखवताना आपल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेली, हे विसरू नका. मोदी-शहा आणि भाजपचे सरकार ‘बेस्ट इंडिया’ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी तुमच्या सारखी ‘वेस्ट’ बडबड करण्याची कोणाला आवड आणि गरज दोन्ही नाहीये. अशी टीका केशव उपाध्ये यांच्याकडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते?
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी करत आहेत. भारतीय जनता पार्टीने सोमवारी (२५ सप्टेंबर) मध्य प्रदेशमधल्या भोपाळ शहरातील जांबोरी मैदानात कार्यकर्ता महाकूंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गंजलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे. काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे. काँग्रेस हा पक्ष आता काँग्रेसचे नेते चालवत नाहीत. काँग्रेस ही एक अशी कंपनी झाली आहे, ज्यांच्या घोषणांपासून धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी आयात केल्या जात आहेत. काँग्रेसचा ठेका आता काही शहरी नक्षलवाद्यांकडे आहे. काँग्रेसमध्ये आता शहरी नक्षलवाद्यांचंच चालतं.