अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकतीच आदिल खान दुर्रानीबरोबर राखी सावंतबद्दल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिला नाना पाटेकरांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने नानांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल बोलून त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करायचं नाही, असं विधान केलं. तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते.
पत्रकार परिषदेत तनुश्रीने तिच्या ‘मीटू’ चळवळीचा उल्लेख केला. तिने नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्याबद्दलही भाष्य केलं. पत्रकार परिषदेत ‘नवभारत टाईम्स ऑनलाइन’ने तनुश्रीला विचारलं की, ज्यांच्यामुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं ते लोक आजही काम करत आहेत आणि त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. तुला काम मिळत नाहीये, यावर तनुश्रीने नाना पाटेकर यांचे नाव घेत “त्यांची लायकी तेव्हाही नव्हती आणि आजही नाही”, असं म्हटलं.
तनुश्री दत्ता म्हणाली, “नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री सारख्या लोकांचा आता माझ्याशी काहीच संबंध नाही. आपण या लोकांबद्दल का बोलायला हवं? त्यांच्याबद्दल बोलून मला प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज आहे. २००८ मध्ये जेव्हा नाना पाटेकर यांच्याशी माझा वाद झाला होता, त्यावेळीही त्यांचा चित्रपट विकला जात नव्हता. त्यांची पात्रता तीच आहे. जेव्हा ते त्यांचे चित्रपट विकू शकत नाही, तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येऊन मला आम्हाला एखादं गाणं करण्यास सांगतात किंवा त्याच्या चित्रपटात पाहुणी भूमिका करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांचा चित्रपट विकला जाऊ शकेल.”
प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा
तनुश्री दत्ता पुढे म्हणाली, “२००८ मध्येही नाना पाटेकरांकडे त्यांचा चित्रपट विकण्याची लायकी नव्हती आणि आजही त्यांच्याकडे त्यांचा चित्रपट विकण्याची लायकी नाही, म्हणून ते मीडियाला भडकवतात जेणेकरून मीडिया मला त्यांच्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारू शकेल आणि मी ज्वालामुखी होऊन काहीतरी उत्तर देईन. माझ्या या उत्तरामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळेल. तसंही ते आधीच रस्त्यावर आले आहेत. २००८ मध्ये ते आधीच रस्त्यावर आले होते. आता मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी द्यायची नाही.”
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanushree dutta says nana patekar cannot run movie at his own he needs my name hrc