ज्येष्ठ दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे सध्या वेगवेगळे चित्रपट आणि वेबसीरिज निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. आज ते चित्रपटांचं दिग्दर्शन जरी करत नसले तरी ते या क्षेत्रात निर्माते म्हणून चांगलेच सक्रिय आहेत. एकूणच गेल्या काही दिवसांत चित्रपटसृष्टीबद्दल बऱ्याच नकारात्मक गोष्टी लिहिल्या, बोलल्या गेल्या आहेत. एकाअर्थी इंडस्ट्रीला खलनायक म्हणून सादर करण्यात येत आहे याबद्दल सुधीर मिश्रा यांनी भाष्य केलं आहे.
नुकतंच अनुभव सिन्हा यांच्या ‘भीड’ चित्रपटादरम्यान यावर जबरदस्त टीका झाली, त्याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही या टीकेचा आणि बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला. या सगळ्या गोष्टींवर आणि सेन्सॉरशीपवर नुकतंच सुधीर मिश्रा यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : अजय देवगणच्या ‘भोला’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुधीर मिश्रा म्हणाले, “चित्रपटसृष्टिबाहेर सध्या सगळेच स्वतःला सेन्सॉर बोर्डच्या जागी समजायला लागले आहेत. मी काहीही बोललो तरी त्यांना माझ्यावर टीका करायचा जणू हक्कच मिळाला आहे. हे फार भयानक आहे. बऱ्याच स्टार्सच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या कथानकात बदल केला जातो, पण मग हीच स्टार मंडळी नंतर सेन्सॉरशीपबद्दल तक्रार करतात.”
पुढे ते म्हणाले, “चित्रपटसृष्टीला खलनायक बनवणं हे फार वाईट आहे. आम्ही सॉफ्ट टार्गेट्स आहोत.चित्रपटसृष्टी तुमचं मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनही करते. मला वाटतं देशातील प्रेक्षकच या क्षेत्रातील लोकांना वाईट वागणूक देतात. या गोष्टीमध्ये सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे.” सुधीर मिश्रा यांनी कुंदन शहा यांच्या ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटातून लेखक म्हणून पदार्पण केलं. आता त्यांचा आगामी चित्रपट ‘अफवाह’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात नवाजूद्दीन सीद्दीकी, भूमी पेडणेकर, आणि तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.