अभिनेता विद्युत जामवाल हा आजच्या घडीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा चाहतावर्ग जगभरात पसरला आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनंतर आता तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच बॉलिवूडमधील काही लोकप्रिय कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
विद्युत जामवाल, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल या तिघांनी त्यांच्या ‘क्रॅक’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विद्युत जामवालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत तो एका पिंजऱ्यात बंदिस्त दिसत असून त्याने हातात चित्रपटाचा क्लॅप धरला आहे. या क्लॅपवर चित्रपटाचे नाव लिहिलेले आहे. यासोबतच त्याने जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल यांचाही असाच एक फोटोही शेअर केला आहे. त्या दोघांनीही हातात चित्रपटाचा क्लॅप धरलेला आहे.
या चित्रपटाची घोषणा वर्षभरापूर्वी झाली होती मात्र चित्रपटाचे नाव निश्चित झाले नव्हते. परंतु अखेर आज या चित्रपटाचे नाव समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्युत जामवाल, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे.
हेही वाचा : “दत्तक, सरोगसी आणि आयव्हीएफसारख्या पद्धती…” विद्युत जामवालच्या वक्तव्याने वेधले लक्ष
झोपडपट्टीपासून खेळापर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे नाव जरी समोर आले असले तरी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे, असे बोलले जात आहे.