दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये गुंतलेला आहे. या कार्यक्रमाच्या सातव्या पर्वामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. बॉलिवूडबद्दलच्या गॉसिप्समुळे हा शो सतत चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या भागामध्ये खास ज्यूरीला आमंत्रित केले असल्याचे प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे.
करण जोहर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो त्यावरचे बरेचसे ट्रेंडसुद्धा फॉलो करत असतो. त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो सध्या चर्चेत आहे. त्याने या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने “हा अवॉर्डचा सीझन आहे आणि या सीझनमधील सर्वोत्कृष्ट एपिसोड कोणता हे ठरवण्यासाठी अतिशय खास ज्युरी या एपिसोडमध्ये आमंत्रित करण्यात आली आहे”, असे कॅप्शन दिले आहे. तन्मय भट्ट, कुशा कपिला, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे करणच्या शोमधल्या खास ज्युरीचे सदस्य आहेत.
या व्हिडीओमध्ये हे चौघे ज्यूरी मेंबर्स मजामस्ती करताना दिसत आहेत. कार्यक्रमाच्या धाटणीनुसार करण आलेल्या पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो. पण या भागामध्ये समोर बसलेले पाहुणे त्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये करण चौघांनाही ‘मी शोमध्ये सतत आलियाचे नाव घेत असतो असं मला सांगण्यात आलं आहे ते खरंय का ?’ असे विचारतो. तेव्हा अभिनेता दानिश सैतने त्याच्या या प्रश्नाचे गमतीदार उत्तर दिले. तो म्हणाला की, “मी काही दिवसांपूर्वी ब्रह्मास्त्र पाहायला गेलो होतो. चित्रपटामध्ये आलिया भट्ट दर काही मिनिटांनी शिवा.. शिवा.. असं म्हणत असते. त्याच प्रमाणामध्ये तू टेलिव्हिजनवर तिच्या नावाचा नेहमी जप करत असतोस” दानिशच्या या उत्तरावर सर्वजण मोठ्याने हसायला लागतात.
‘कॉफी विथ करण’मध्ये नेहमी बॉलिवूडमधील सिनेकलाकारांना बोलवण्यात येते. या नव्या भागाच्या निमित्ताने या शोमध्ये पहिल्यांदा सोशल मीडियावरील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. या पर्वातला हा भाग येत्या गुरुवारी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.