आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे. आता या विषयावर का चित्रपट करावा वाटला आणि तो हनुमंत केंद्रे यांच्यापर्यंत कसा पोहोचला, याचा किस्सा आदिनाथ कोठारेने एका मुलाखतीत सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला आदिनाथ कोठारे?

आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच लोकशाही मराठी फ्रेंडली या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत हुनमंत केंद्रे यांच्यापर्यंत पोहोचण्याची प्रोसेस कशी होती? या प्रश्नाचे उत्तर देताना आदिनाथने म्हटले, “२०१५ मध्ये सिनेमाचे दिग्दर्शन करायचे ठरवले. त्यासाठी मी विषय शोधत होतो. स्वत:ला विचारत होतो की अशी कोणती गोष्ट आहे, जी मला मनापासून सांगायची आहे? अशी कोणती गोष्ट आहे, जी मला अस्वस्थ करते आणि मला अंत:करणापासून, हृदयापासून सांगायची आहे? पाण्याचा विषय हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, महत्त्वाचा आहे. पाण्याच्या टंचाईची झळ आपल्यापर्यंत अजून पोहोचली नाहीये.”

“मी रिसर्च करत होतो, त्यावेळी मी काही डॉक्युमेंटरी बघितल्या. आमिर खानने सत्यमेव जयतेची सीरिज केली होती. त्यामध्ये पाण्यावरचा एक एपिसोड त्यांनी केला होता. त्यामध्ये हनुमंत केंद्रे या माणसाची मला मुलाखत सापडली आणि मला असं वाटलं की, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कदाचित यावर चित्रपट होऊ शकतो, असं मला त्या क्षणी वाटलं.”

“मी हनुमंत केंद्रे यांचा नंबर शोधत होतो. सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकर यांना मी फोन केला. त्यांनी मला हनुमंत केंद्रेंचा मोबाइल नंबर दिला. मी त्या नंबरवर फोन केला, तर हा नंबर अस्तित्वात नाही, असं ऐकायला मिळालं. “

“मला माहीत होतं, ही व्यक्ती नागदरवाडीमध्ये राहते. मी गूगल मॅपवर बघितलं की नागदरवाडीजवळ नांदेड आहे. मग मी नांदेडच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तिथून मला लोहा तालुक्याचा नंबर मिळाला. तिथून मला माळकोळी गावचा नंबर मिळाला. माळकोळीशी संपर्क साधला, सुदैवाने तेव्हा ते गावाचे सरपंच झाले होते. तिथून मला त्यांचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला. हनुमंत केंद्रेंनी फोन उचलला आणि मी त्यांना म्हणालो,
हनुमंतजी नमस्कार, मी आदिनाथ कोठारे, मुंबईवरून बोलतोय. मी नट आणि निर्माता आहे. मी ‘सत्यमेव जयते’मध्ये तुमची मुलाखत बघितली. तर मला असं वाटतंय की यावर आपण चित्रपट करू शकतो. मी तुम्हाला येऊन भेटू शकतो का? दोन मिनिटं शांतता होती. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही इथे या, मग माझा विश्वास बसेल. मी लगेच ट्रेनचे तिकीट काढले आणि दुसऱ्याच दिवशी मी गेलो. तिथे ते मला भेटले. हनुमंतजी मला न्यायला आले होते. त्यांनी मला गाव दाखवलं”, अशी आठवण आदिनाथ कोठारेने सांगितली आहे.

हेही वाचा: “दंगलने २ हजार कोटी कमावले अन् आम्हाला फक्त…”, बबिता फोगटचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या वडिलांनी…”

दरम्यान, ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, विकास पांडुरंग पाटील, रजित कपूर, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, किशोर कदम, श्रीपाद जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adinath kothare on how he reached to hanuman kendre for paani movie nsp