‘गोरे रंग पे न इतना गुमान कर’ हे गाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचा. ६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर मुमताज या चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे दिसत आहे. आता चाहत्यांना पुन्हा मुमताज स्क्रीनवर कधी दिसणार याचे उत्तर स्वत: मुमताज यांनी दिले आहे.
मुमताज यांनी नुकताच इन्स्टाग्राम लाइव्ह केले आहे. या लाइव्हमध्ये एका चाहत्याने मुमताज यांना ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण कधी करणार?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटले, ‘बॉलिवूड? मला नाही माहिती. मला नाही वाटत आता मला आवडेल अशी कोणती भूमिका मला मिळेल आणि जर ती मी साकारली तर लोकांना ती आवडेल.’
आणखी वाचा : शबाना आझमींनी कंगनाला ‘त्या’ पोस्टमुळे फटकारले म्हणाल्या, ‘अफगाणिस्तान हा…’
पुढे त्या म्हणाल्या, ‘सर्वात पहिले पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मला माझ्या पतीची परवानगी घ्यायला लागेल. जर त्यांनी होकार दिला तर मी करण्याचा विचार करेन. नाही तर नाही.’ मुमताज यांचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट नाही. त्या त्यांची नात तान्या माधवानीच्या अकाऊंटवरुन चाहत्यांशी गप्पा मराताना दिसत होत्या.
‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच या सौंदर्यवतीचं नाव काही सहकलाकरांशी जोडलं गेलं. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे शम्मी कपूरसोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे. १९७४ मध्ये त्यांनी मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या. सध्याच्या घडीला मुमताज चित्रपटसृष्टीपासून फार दूर असल्या तरीही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान मात्र कायम आहे.