कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. या वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलने केली जात आहेत. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. तिची पोस्ट पाहून आता अभिनेत्री शबाना आझमी यांनी तिला फटकारले आहे.
शबाना आझमी यांनी कंगनाची पोस्ट शेअर करत ट्वीट केले आहे. ‘अफगाणिस्तान हा ईश्वरशासित देश आहे. जर मी चुकीचे बोलत असेल तर मला सांगा आणि जेव्हा मी शेवटचे तपासले तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश असल्याचे मला दिसले?’ या आशयाचे ट्वीट करत शबाना आझमी यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे.
आणखी वाचा : हा चित्रपट कसा इतका हिट ठरला?; मिथुन चक्रवर्ती यांची ‘पुष्पा’वर प्रतिक्रिया
काय होती कंगनाची पोस्ट?
कंगना रणौतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इराण. १९७३ आणि आता. पन्नास वर्षात बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत. जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात.”
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.