स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘बाई गं’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. यामध्ये अभिनेत्याबरोबर तब्बल ६ अभिनेत्री झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सध्या प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘जंतर मंतर बाई गं’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सध्या या गाण्याला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब अन् चेतना भट यांनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवाली परब आणि चेतना भट गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकत्याच या दोन अभिनेत्रींनी स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’ चित्रपटाच्या शीर्षक गीतावर म्हणजेच ‘जंतर मंतर बाई गं’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
हेही वाचा : “आफ्रिका घाबरायचं बरं का…”, भारताची T20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक, मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट
शिवाली परबने या गाण्यावर डान्स करताना अबोली रंगाचा फ्लॉवर प्रिंट असलेला सुंदर असा वनपीस घातला होता. तर, चेतनाने डान्स करताना साडी नेसली होती. या दोघींचा सुंदर डान्स पाहून नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाली आणि चेतनाच्या व्हिडीओवर अभिनेता स्वप्नील जोशीने या दोघींचं कौतुक करत खास कमेंट केली आहे. त्याने कमेंट्स सेक्शनमध्ये लव्ह इमोजी शेअर केले आहेत. तर, सुकन्या मोने हा डान्स पाहून कमेंट्समध्ये “थँक्यू डिअर…तुम्ही दोघी किती गोड नाचल्या आहात. अभिनय तर अहाहा” असं म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : Hina Khan Cancer : अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…
स्वप्नील सुकन्या यांच्यासह नम्रता संभेराव, इशा डे यांनी देखील शिवाली परब आणि चेतना भट या दोघींचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘बाई गं’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर स्वप्नील जोशीबरोबर ‘बाई गं’ चित्रपटात सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा सहा अभिनेत्री झळकणार आहेत. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. त्यामुळे यामागे नेमका काय ट्विस्ट आहे हे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd