मुंबई : उत्तर भारतात भाजपच्या संख्याबळात फारसा फरक पडणार नाही. दक्षिण, ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमधील जागांमध्ये वाढ होणार आहे. भाजप ३४० ते ३५५ जागा जिंकेल. गेल्या वेळी मित्र पक्षांनी ७७ जागा जिंकल्या होत्या. मित्र पक्ष तेवढ्याच जागा जिंकतील. यामुळे आमचे चारशे पारचे ध्येय साध्य होण्यात अडचण येणार नाही, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील १६० लोकसभेच्या जागा अशा आहेत की त्या भाजपने कधीच जिंकलेल्या नाहीत. यातील जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यासाठी माझ्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. गेली दोन वर्षे या मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारसंघातील नामवंताशी चर्चा, केंद्रीय योजनांच्या लाभार्थींकडून आढावा, आणखी काय बदल करता येतील या दृष्टीने त्यांची मते जाणून घेणे, भाजपबद्दल मत अनुकूल करणे या उपक्रमातून या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद वाढली. या १६० पैकी ६० ते ६५ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

दक्षिणेतही जागा वाढतील

आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये भाजपच्या सध्याच्या संख्याबळात वाढ होईल. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये चित्र कायम राहील. बिहारमध्ये एखादी जागा कमी होऊ शकते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गतवेळच्या तुलनेत आमच्या जागांमध्ये चांगली वाढ अपेक्षित आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नाही ही खंत

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश या उत्तरेतील सर्व राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. उत्तरेत केवळ बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री नाही ही पक्षासाठी नेहमीच सल असते. ही सल दूर करण्यावर बिहारचा प्रभारी म्हणून माझी जबाबदारी आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यासाठी आतापासूनच आम्ही तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> प्रत्येक टप्प्यातील प्रचाराची दिशा आधीच निश्चित

आशीष शेलार यांचा लोकसभा लढण्यास नकार

भाजपची एवढे मजबूत संघटन असतानाही उज्ज्वल निकम, नवनीत राणा यांच्यासारख्या पक्ष सदस्य नसलेल्यांना उमेदवारी का देण्यात आली या प्रश्नावर तावडे म्हणाले, ज्यांना सांगितले त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळे बाहेरचे उमेदवार आम्हाला उतरावे लागले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना लोकसभा लढण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांना राज्याच्या राजकारणात अजून शिकावेसे वाटते. कदाचित नंतर ते राष्ट्रीय राजकारणाचा विचार करू शकतात.

लग्नाचे मुहुर्त बदलले

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली त्याच दिवशी रात्री आम्ही बिहारमधील नेत्यांबरोबर चर्चा करून मतदानाच्या तारखांच्या दिवशी किती विवाहसोहळे आहेत याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. तसा आढावा घेतल्यावर ६० ते ६५ विवाहसोहळे त्याच दिवशी असल्याचे आढळले. ज्यांच्या घरी विवाहसोहळे होते त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्यानुसार ६५ लग्न मुहुर्त बदलण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघात पर्यटनासाठी जाणाऱ्या सुमारे ६८ हजार जणांनी बाहेर जाण्याच्या तारखा बदलल्याचेही तावडे यांनी सांगितले.

बाळासाहेबांची मते कायम राखण्याचे उद्धव यांच्यापुढे आव्हान

उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या ज्या दिशेने चालली आहे, ज्यात हिंदू दहशतवादी असा मुद्दा संजय राऊत यांनी मालेगावच्या सभेत उपस्थित केला. ज्या बाळासाहेबांनी ‘लष्कर-ए-तय्यबा’ला ‘लष्कर-ए-शिवबा’ असे उत्तर दिले ती शिवसेना कसाबच्या गोळीने करकरे मृत्युमुखी पडले नाहीत, असे म्हणणाऱ्या वडेवट्टीवार यांच्या बरोबर तुम्ही बसणार. जे सुशीलकुमार शिंदे ‘हिंदु दहशतवादी’ ठसवायचा प्रयत्न करीत होते त्या दिशेने ठाकरेंची शिवसेना चालली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी मते आहेत ती बाळासाहेबांची मते आहेत. सध्या ज्या दिशेने ठाकरे यांची शिवसेना चालली आहे ते मराठी माणसाला पटणारे नाही. शिवसेनेला मुस्लीम मते का देतात तर ती राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसमुळे. मुस्लीम मतांसाठी अनुनय करणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे पाहतोय ना बाळासाहेबांचा मतदार. उद्धव ठाकरें यांनी संघाला बरोबर येण्याचे आवाहन केले. पण मुस्लीम मतांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सहानुभूती मिळणे कठीण आहे. मुख्यमंत्रीपदावर बसल्यावर घराबाहेर पडून क्षमता दाखवून दिली असती तर लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला असता. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेसाठी मिळविलेली मते कायम राखणे हे उद्धव ठाकरे यांना सोपे नाही, किंबहुना जमणार नाही.

निवडणूक रोखे… काय चूक आहे?

निवडणूक रोखे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत आश्चर्य वाटते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे काहीही बोलता येत नाही. पण त्यात काय चूक आहे? आता रोख्यांच्या स्वरूपात नाही तर पुन्हा रोखीने पक्षांना देणग्या घेता येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सरसकट रोखेपद्धती मागे न घेता सुधारणा सुचविली असती तर ते योग्य झाले असते. या विरोधात जे न्यायालयात गेले त्यांना वाटले भाजपकडे गेलेला अदानी-अंबानीचा पैसा बाहेर येईल, असे वाटले असेल. पण त्यांना एक कळत नाही की, देणग्या या ट्रस्टमधून येत असतात. हा निर्णय मागे घेतल्यामुळे पुन्हा आता सारे मोकाट सुटतील. तुम्ही ज्या उद्देशाने ही योजना आणली त्याचा हेतू चांगला होता. परंतु पारदर्शकता वाढली पाहिजे. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असते तर ते संयुक्तिक ठरले असते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader vinod tawde express confidence to win 400 seats in loksatta lok samvad event zws