लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ऐन गणेशोत्सव काळात मध्य, पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल उशिराने येण्याचे प्रमाण वाढले आहे. सलग तीन दिवस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, पर्यटक आणि नोकरदार वर्गाला लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसत आहे. गणेशभक्तांची वाढलेली लोकलमधील गर्दी आणि विलंबामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे नवख्या प्रवाशांची प्रचंड दमछाक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गणेशोत्सव काळात भाविक, प्रवाशींची होणारी गर्दी लक्षात घेऊन हे काम बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, सहाव्या मार्गिकेच्या कामातील भाग म्हणून मालाड येथे नवीन मार्गिका उभारण्यात येत आहे. नवीन मार्गिका तयार केल्याने बोरिवली – अंधेरी दरम्यान वेगमर्यादा ताशी २० किमी ठेवली आहे. परिणामी, लोकल सोमवारपासून २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून समाज माध्यमांवर तक्रारींचा भडीमार होऊ लागली आहे. तसेच पुढील काही दिवस वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता असल्याने गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांना लोकल विलंबाच्या विघ्नाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>राज्यात साथरोग आजारात वाढ! राज्य संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण उच्चस्तरीय समितीची बैठक…

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे लाखो प्रवाशांना विलंबाचा फटका बसत आहे. ट्रान्स हार्बरवर नेरूळदरम्यान पॅन्टोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाला. लोकल बंद असल्यामुळे नोकरदारांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी बस आणि पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस सेवेवर प्रचंड ताण आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

– बुधवारी सकाळी ७.३० वाजता टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान गीतांजली एक्स्प्रेसची आपत्कालीन साखळी ओढल्याने एक्स्प्रेस थांबली. त्यानंतर एक्स्प्रेसचा व्हॅक्यूम प्रेशर पाईप फुटल्याने एक्स्प्रेस सुरू करणे कठीण झाले. त्यामुळे सुरुवातीला टिटवाळा – कसारा डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली.

– मंगळवारी दुपारी १२.५० च्या दरम्यान कांदिवली – मालाड दरम्यान पाॅंइटमध्ये बिघाड झाल्याने, लोकल सेवा विस्कळीत झाली.

– मंगळवारी पहाटे ४.५५ च्या सुमारास नेरुळ दरम्यान पॅन्टोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी सकाळी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. तसेच स्थानकांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे पनवेल नेरूळ दरम्यानच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. ठाणे स्थानकातील पादचारी पुलावर आणि फलाटावर गर्दी झाल्याने महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

– सोमवारी संपूर्ण दिवसभर चर्चगेट – विरार दरम्यानची धीमी आणि जलद मार्गावरील लोकल सेवा विलंबाने धावत होती.

हेही वाचा >>>वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप

गेल्या सलग तीन दिवसांपासून मध्य, पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल खोळंबा होत आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू केल्याने, प्रवाशांचा प्रवास विलंबाने होत आहे. त्यात आता गुरुवारपासून मुंबईतील सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई महानगरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी लोकलमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करण्याची शक्यता असून प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी वेळेत लोकल चालवणे आवश्यक आहे. त्यामुळे एकाच लोकलमध्ये गर्दी होणार नाही.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During ganeshotsav period technical failure on central and western railways late arrival of local trains increased mumbai print news amy