Mumbai Bandra Fire Updates : मुंबईतील वांद्रे परिसरातील लिंक स्क्वेअर मॉलला भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे चार वाजता या मॉलमधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आग मॉलमध्ये पसरली. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या मॉलमध्ये अनेक रेस्तराँ असून या रेस्तराँच्या किचनमध्ये बरेच गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

दरम्यान, या आगीबाबतचं वृत्त समजताच माजी आमदार झीशान सिद्दिकी घटनास्थळी दाखल झाले. मॉलची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आग लागली तेव्हा काही सुरक्षा कर्मचारी तिथे होते. परंतु, त्यांना तिथे उपलब्ध असलेली आग विझवण्याची उपकरणे हाताळता येत नसल्याने ते काहीच करू शकले नाहीत. परिणामी आग आणखी वाढली. ही खूप दुर्दैवी बाब आहे.”

आग विझवण्याची यंत्रणा आहे मात्र कर्मचारी प्रशिक्षित नाहीत हे खूप दुर्दैवी आहे : झीशान सिद्दिकी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते झीशान सिद्दिकी म्हणाले, “अग्निशमन दल येथे पोहोचण्यापूर्वी आम्ही पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता. आतमधील कर्मचाऱ्यांना आग विझवण्याची यंत्रणा हाताळता येत नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. ही खूप दुर्दैवी बाब आहे. आपल्याकडे आग विझवण्यासाठीची यंत्रणा आहे. मात्र ती यंत्रणा हाताळण्याचं प्रशिक्षण नाही हे खूपच दुर्दैवी आहे. आम्ही सकाळी चारच्या दरम्यान येथे पोहोचलो. त्यावेळी ना पोलीस इथे आले होते ना अग्निशमन दल. सहा वाजता सर्वजण इथे दाखल झाले.”

अग्निशमन दल बेजबाबदार; झीशान सिद्दिकींचा आरोप

स्थिती हाताबाहेर जात होती, त्यामुळे मी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी बोललो. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या, असा दावा करत सिद्दिकी म्हणाले, “या मॉलमध्ये अनेक रेस्तराँ आहेत. या रेस्त्रराँच्या किचनमध्ये अनेक मोठे गॅस सिलिंडर आहेत. आग या रेस्तराँमध्ये पसरली आणि सिलिंडरचे स्फोट झाले तर खूपच गंभीर स्थिती निर्माण झाली असती. लिंकिंग रोडवर आग पसरली असती. अग्निशमन दल या घटनेबाबत काय अहवाल देईल हे मला सांगता येणार नाही. मात्र, ही स्थिती हाताळताना अग्निशमन दलाचा बेजबाबदारपणा दिसला. मला चार वाजता या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आग फार मोठी नव्हती. मात्र आता आग मॉलमध्ये पसरली आहे.”

दरम्यान, गेल्या सात तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, अद्याप (दुपारी १ वाजेपर्यंत) अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.