मुंबई: कधी काळी मुंबईची ओळख असलेल्या आणि मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून ओळख देणाऱ्या मुंबईतील कापड गिरण्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. जवळपास सगळ्या कापड गिरण्या बंद झाल्या आहेत. बंद झालेल्या कापड गिरण्या आता कोन, पनवेलमध्ये वसल्या आहेत. कोन, पनवेलमध्ये गिरणी कामगारांसाठीच्या २४१७ घरांच्या संकुलातील ११ इमारतींचे नुकतेच नामांतर करण्यात आले असून या इमारतींना बंद गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. अपोलो, कोहिनूर, स्वदेशी, श्रीराम मिल आदी गिरण्यांची नावे इमारतींना देण्यात आली आहे. बंद गिरण्यांचा आणि गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास पुसला जाऊ नये या उद्देशाने या इमारतींना गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.

२०१६ च्या सोडतीतील ११ इमारती

बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यासाठी गृहयोजना राबविल्या जात आहेत. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळावीत यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्वावरील घरांच्या प्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार एमएमआरडीएकडून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्राप्त झालेल्या कोन, पनवेलमधील २४१७ घरांसाठी मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली. सोडतीनंतर काही वर्षातच घरांचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी हा ताबा रखडला होता. मात्र २०२४ पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी घरांचा ताबा घेत गृहप्रवेश केला आहे. आता तेथे वास्तव्यास असलेल्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी २४१७ घरांच्या समावेश असलेल्या आपल्या संकुलातील ११ इमारतींचे अखेर नामांतर केले आहे. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचा मुहुर्त साधत १ मे रोजी ११ इमारतींचे नामांतर करण्यात आल्याची माहिती कोन, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीने दिली.

चिठ्ठ्या काढून इमारतींना नावे

गिरणी कामगारांच्या योगदानाची आठवण म्हणजे मुंबईतील बंद गिरण्या. गिरणी कामगार आणि गिरण्यांचा मोठा वाटा मुंबईच्या जडणघडणीत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांचे हे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहचावे आणि हा इतिहास जपला जावा यासाठी इमारतींना बंद गिरण्यांची नावे देण्यात आल्याचेही समितीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान इमारतींना नावे देताना समितीसमोर ४० ते ६५ गिरण्यांची नावे होती. त्यातून चिठ्ठ्या काढून ११ नावे निश्चित करण्यात आली आणि ती आता इमारतींना देण्यात आली आहेत. त्यानुसार अपोलो, इंडिया युनायटेड, कोहिनूर, माॅर्डन, स्वदेशी, स्टॅडर्ड, श्रीराम, ज्युपिटर, मुंबई स्वान, गोल्ड मोहर अशी ही नावे आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील या ११ इमारती याच नावाने ओळखल्या जाणार आहेत.