केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. आज सकाळी नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. आधी मुंबई विमानतळ, नंतर बाळासाहेब स्मारक आणि दुपारी परळ या भागात नारायण राणेंनी स्थानिक जनतेशी संवाद साधला. या प्रत्येक वेळी नारायण राणेंनी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि शिवसेना या मुद्द्यांना हात घालत टीकास्त्र सोडलं आहे. परळमध्ये बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोचक टीका करतानाच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये सत्तापालटाचा आत्मविश्वास व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले, पण…

“मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, मग मराठी माणसाच्या जीवनात हे परिवर्तन का करू शकले नाहीत? मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले, पण मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल नाही. आजही अनेक शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. ही पाळी का आणावी?”, असा सवाल नारायण राणे यांनी परळमध्ये बोलताना विचारला आहे.

“आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच…”, राणेंनी दिला आठवणींना उजाळा!

“कसले मुख्यमंत्री? हे पिंजऱ्यात राहतात”

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. “या राज्याचे मुख्यमंत्री कुणी आहेत असं मला वाटतच नाही. काही दम नाही. कसले मुख्यमंत्री, पिंजऱ्यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं”, असं ते म्हणाले.

“३२ वर्षांत बकाल करून टाकली मुंबई. किती माणसं मुंबईत करोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा”, असं राणेंनी यावेळी नमूद केलं.

कधीकाळी राणेंचा निवडणुकीत पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांनीच आज केलं राणेंचं स्वागत!

“स्मारकाच्या ठिकाणी कुणीही आडवं आलं नाही”

दरम्यान, नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकावर दर्शनासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आधी काही शिवसैनिकांनी घेतली होती. आज नारायण राणेंचं विनासायास स्मारक भेट झाली. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली. “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर मी मानवंदना देण्यासाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. कुणी मला अडवायला तरी आलं पाहिजे. पण कुणीच आलं नाही. माणसं राहिलेच नाहीयेत शिवसेनेत. झाडावर उड्या मारतात, तेवढेच उरलेत”, असा टोला राणेंनी लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane mocks cm uddhav thackeray shivsena bmc election 2022 bjp jan ashirvaad yatra pmw