विकास महाडिक, लोकसत्ता

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने हिंदूत्व सोडल्याचा प्रचार भाजप एकीकडे करीत असताना निवडणूक आयोगाने प्रचार गीतातून हिंदू आणि भवानी शब्द काढून टाकण्याची दिलेल्या नोटिशीमुळे या पक्षाला मुद्दाच मिळाला आहे. आम्ही हिंदूत्व जपत आहोत आणि महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा जागर करीत असताना निवडणूक आयोग आम्हाला रोखत आहे असा ठपका ते प्रचारात ठेवण्याची चिन्हे आहेत. यातून भाजपला लक्ष्य केले जाईल.

हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाच्या या नोटिशीमुळे ठाकरे गट उत्तर देणार आहे. राज्यात साडेचार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला.  त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेनेने हिंदूत्व सोडले असा प्रचार भाजपने सुरू केला.

हेही वाचा >>> गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला. त्यामुळे भाजपच्या प्रचाराला बळ मिळाले. हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन हा गट बाहेर पडल्याचा दावा भाजपसह शिंदे गट करीत आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाने भाजपचीही कोंडी झाली.

ठाकरे गटाने तयार केलेल्या प्रचार गीतात हिंदू आणि जय भवानी हे दोन शब्द वापरण्यास ठाकरे गटाला मज्जाव केला आहे. भवानी मातेचा अपमान सहन करणार नाही असाच प्रचार करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही. त्याचा एका गीतामध्ये  समावेश सरकारला सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे पण हा शब्द प्रचार गीतामधून काढणे शक्य नाही. उलट तो सातत्याने बोलत राहू असा संदेश ठाकरे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बजरंग बली, रामलल्ला हे शब्द वापरलेले चालतात आणि आम्ही वापरलेला देवीचा भवानी शब्द चालत नाही असे ठसविण्याचा उद्धव यांचा  प्रयत्न राहील अशीच चिन्हे आहेत.