मुंबई : अंधेरी वर्सोवा भागातील शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कट्टर, निष्ठावंत माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी सोमवारी ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला व शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून सात वर्षे अनवाणी चालणाऱ्या पटेल यांच्या या निर्णयामुळे राजकारणाच्या वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्यावेळीच पटेल या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र त्या ठाकरे यांच्या पक्षातच राहिल्या व निवडणुकीचे कामही केले. मात्र आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाच्या रणरागिणींमध्ये राजूल पटेल यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी आणि प्रचंड जनसंपर्क असल्यामुळे त्या तब्बल तीन वेळा मुंबई महानगरपालिकेत निवडून आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजूल पटेल या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र सोमवारी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनीही व मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महानगरपालिकेतील आतापर्यंत सुमारे ७० ते ८० माजी नगरसेवकांनी आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राजुल पटेल यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. शिवसेना व भाजपची युती असताना भाजपने तेव्हा भारती लव्हेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी पटेल यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हाही पटेल यांची निष्ठा ठाकरे यांच्याशीच असल्याचे उघड गुपित होत्या. त्या निवडणुकीत मोजक्या दिवसात पटेल यांनी चांगली मते खेचली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अपेक्षित होती. त्यासाठी त्या खूप इच्छुक होत्या. मात्र पक्षाने त्यांना डावलून हारून खान यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्या नाराज झाल्याची चर्चा होती. पटेल या पक्ष सोडणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू होती. मात्र त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे यांनी या मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार दिल्याचा निर्णयही त्यांना पटला नव्हता. तसे त्यांनी वरिष्ठांना कळवलेही होते. मात्र निवडणुकीच्या काळात त्या ठाकरे यांच्या पक्षाबरोबरच राहिल्या होत्या.

सात वर्षे अनवाणी

शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत या महाराष्ट्रात होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा राजूल पटेल यांनी केली होती. त्यानंतर तब्बल सात वर्षे त्या अनवाणी चालत होत्या. मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पायात चप्पल घातली होती. तोपर्यंत त्या रोज सर्वत्र अनवाणी चालत असत. त्यांच्या निष्ठेचा दाखला शिवसेनेत दिला जात असे. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मी पक्षावर नाराज नाही. पण विभागांतर्गत जे राजकारण सुरू आहे त्याला मी प्रचंड कंटाळले होते. आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत घेतली आणि आता तेच आम्हाला चांगली वागणूक देत नसतील तर काम करणे कठीण होते. सहकाऱ्यांमध्ये भांडणे होत असतात पण अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले की तेथे थांबता येत नाही. – राजूल पटेल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena mumbai print news zws