विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत सोमवारी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासह २३ उमेदवारांचे भाग्‍य पेटीबंद झाले. या निवडणुकीत ४५ ते ५० टक्‍के मतदान झाल्‍याचा अंदाज आहे. गेल्‍या निवडणुकीत ६३.४६ टक्‍के मतदानाची नोंद झाली होती. त्‍यापेक्षा हे प्रमाण कमी आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्‍त होऊ शकेल, असे विभागीय आयुक्‍त कार्यालयातर्फे सांगण्‍यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

विभागातील पाच जिल्ह्यांमध्‍ये २६२ मतदान केंद्रांवर आज सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्‍के मतदानाची नोंद झाली होती. २ वाजेपर्यंत ३०.४० टक्‍क्‍यांपर्यंत आकडेवारी पोहोचली. मतदान केंद्रांवर सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदारांच्‍या रांगा दिसल्‍या. सुरूवातीला मतदानाची गती मात्र संथ होती. अमरावती विभागात १ लाख ३४ हजार १४‎ पुरूष आणि ७२ हजार १४१ महिला व इतर‎ १७ असे एकूण २ लाख ६ हजार १७२‎ मतदारांची नोंदणी झाली होती. अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत २६.१५ टक्के मतदान झाले होते. अकोला जिल्ह्यात ६१ मतदान केंद्रांवर २८.४५ टक्के, बुलढाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रांवर ३३.४७ टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रांवर ३५.६० टक्के तर वाशीम जिल्ह्यात २६ मतदान केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत ३४.३७ टक्के मतदान झाले होते.
अनेक मतदान केंद्रावर खोली शोधण्यासाठी मतदारांची चांगलीच धावपळ दिसून आली. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जास्तीत-जास्त मतदान होण्यासाठी सक्रिय असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>बुलढाणा: वेदनांची तमा न बाळगता कॅन्सरग्रस्त रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा भाजप-शिंदे गट, महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित व अपक्ष असा सामना रंगला आहे. या बहुरंगी लढतीने उत्सुकता ताणल्या गेली असून, प्रत्येक उमेदवार मतदाराला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केला. कोणी आम्ही काय केले व काय करणार हे सांगण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. प्रतीस्पर्धींवर टीकाही करण्‍यात आली. त्यामुळे कोणाच्या रणनितीला यश येते, हे २ फेब्रुवारी रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. येथील बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 to 50 percent voting in amravati graduate constituency mma 73 amy