लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदविण्यात आले. उष्णतेच्या लाटेमुळे सरासरी कमाल तापमानात तीन ते सहा अंशांची वाढ झाली आहे. तर किमान तापमानातही दोन ते चार अंशांची वाढ आहे.

राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असल्यामुळे तसेच उत्तरेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी विदर्भातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. भारतीय हवामान खात्याने विदर्भात दिलेल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रत्यक्षात उतरला असून ११ पैकी सहा जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपुढे गेले आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगाने चढत आहे. त्याचवेळी नागपूर आणि वर्धा ही शहरे देखील तापू लागली आहेत. भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही शहरांना ११ ते १३ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मंगळवारपासूनच विदर्भात उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली. बुधवारी उष्णतेचा ताप आणखीच तीव्र झाला.

राज्यात यंदा होळीच्या आधीपासून म्हणजे, फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच उन्हाळ्याची सुरुवात झाली. मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ झाली. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर पोचले आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. तर जळगाव, सोलापूर या ठिकाणी पारा ४० अंशांच्या जवळ पोचला आहे. कमाल सरासरी तापमानात तीन ते सहा अंशांची वाढ झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. किमान तापमानातही सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर व अकोल्यात गुरुवारी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat wave in vidarbha as predicted by india meteorological department rgc 76 mrj