यवतमाळ : पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी यवतमाळ शहरालगतच्या अनेक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षार्थींसह बारावीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. उद्याच राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. परिक्षार्थ्यांनी बदललेल्या मार्गाची नोंद घेऊन वेळेवर परिक्षेस पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क सवंर्गातील पदांची आयबीपीएस मार्फत सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येत आहे. सदर पदभरतीची परीक्षा जिल्ह्यामध्ये २६ ते २९ फेब्रुवारी दरम्यान एआय टेक्नॉलॅाजी ऑनलाईन परीक्षा केंद्रद्वारा साई बीएड महाविद्यालय वाघापूर बायपास, चौसाळा रोड, यवतमाळ येथे घेण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कळंब ते यवतमाळ वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक बाभूळगाव, जोडमोहा आदी मार्गांहून वळविण्यात आली आहे. या दिवशी परिक्षार्थींनी वळविलेल्या मार्गाचा अवलंब करून वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावे, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – सगेसोयरे, गणगोताबाबतचा मसुदा रद्द करण्यासाठी दबाव, ओबीसींच्या विविध संघटनांचा विरोध

बसेसवर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठ्यांची ड्यूटी

पंतप्रधानांच्या सभेला जिल्ह्यातून महिला उपस्थित राहणार आहे. महिला मेळाव्यात किमान दोन लाख महिला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. विदर्भातील बहुतांश आगारातील बसेस आज मंगळवारी दुपारीच यवतमाळ जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचल्या आहेत. या प्रत्येक गावातून लोकसंख्येनुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बसवर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील अनेक एक शिक्षकी शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली. तर उद्या बुधवारीही या शाळा शिक्षकाअभावी बंद राहणार आहेत. बसेस मोदींच्या सभेसाठी व्यस्त राहणार असल्याने बारावीतील परीक्षार्थींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

वाहतूक मार्गात करण्यात आलेला बदल बुधवारी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत अंमलात राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

झाडांची कत्तल, मोकाट श्वानांवर संक्रांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या, बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ नजीक भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांसह मुक्या प्राण्यांचीही फरफट सुरू आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेने हा परिसर आजच ताब्यात घेतला आहे. सोबतच महाराष्ट्र पोलीस आणि होमगार्ड यांचीही ड्यूटी लावण्यात आली आहे.

सभा परिसरातील सुरक्षेसाठी मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्यानंतर या परिसरातील मोकाट पशु, पक्ष्यांवरही संक्रात आली आहे. सभा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यांनाही त्यांची जनावरे बाहेर येवू न देण्याचे फर्मान दिले आहे. परिसरातील मोकाट श्वानांना पकडून इतरत्र सोडून देण्यात येत आहे. या मोकाट श्वानांना पकडल्यानंतर अत्यंत अमानवीय वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप येथील ओलावा पशु प्रेमी संस्थेने केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi meeting at yavatmal roads closed inconvenience to students nrp 78 ssb
First published on: 27-02-2024 at 17:18 IST