लोकसत्ता टीम

नागपूर : गडचिरोलीतून विधान परिषदेवर आदिवासी समाजाचा प्रतिनिधी पाठवला तर त्याचा महायुतीला फायदा होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी याबाबत विचार केला पाहिजे, असे मत राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केले.

आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गडचिरोलीत विधानसभेच्या जास्त जागा जिंकायच्या असतील तर मला पालकमंत्री पदातून मुक्त करा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. शिवाय सहा महिने आधी अजित पवार यांना सांगितले होते की मला गोंदियाचे पालकमंत्री पद झेपणार नाही. पालकमंत्री पद सहामहिने आधीच सोडले आणि त्यावर शिक्कामोर्तब करायला सांगितले होते. अजित पवार यांनी माझी विनंती मान्य केली आहे. यात नाराजीचा प्रश्न नाही.

आणखी वाचा-यूजीसीकडून ‘डिफॉल्टर’ विद्यापीठांची यादी जाहीर… यात तुमचे विद्यापीठ तर नाही?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. गडचिरोलीमध्ये महायुतीच्या राभवाचे आम्ही आत्मचिंतन करत आहोत. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत खोटा प्रचार केला आहे. आता विधानसभा निवडणुकीत आम्ही गडचिरोली जिल्ह्यात सर्वच मतदार संघात जनतेपर्यंत पोहचवून महाविकास आघाडीने कसा खोटा प्रचार केला हे त्यांच्यापर्यंत पोहचवणार आहोत. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला विदर्भात २० जागा मिळाव्या ही आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत कोणामुळे जागा कमी मिळाल्या यावर चर्चा कारण्यापेक्षा आता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर मिळून आम्हाला ५ जागा मिळायला हव्या आणि तशी महायुतीकडे मागणी केली जाणार आहे.

आणखी वाचा-राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी खूशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता…

छगन भुजबळ आमचे वरिष्ठ नेते आहे. ते नाराज नाहीत. लोकसभा निवडणूक लढवायची प्रत्येकाची इच्छा असते. मी देखील गडचिरोलीची जागा मगितली होती निवडून देखील आलो असतो पण आता तो विषय आमच्यासाठी बंद झाला आहे. आता विधानसभा निवडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीचे लवकर जागा वाटप झाले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील २० जागा मागितल्या. त्यातील १० जागांवर मी स्वतः सर्वेक्षण केले आहे. १० जागा अमरावतीमध्ये आहेत. नरहरी झिरवळ यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे. ते नाराज नाहीत. त्यांनी सांगितले सोशल मीडियावर लोक वेगळ्या चर्चा करतात. मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा गेल्या १ वर्षापासून ऐकत आहे. जेव्हा होईल तेव्हा बघू मात्र सध्या त्या विषयावर चर्चा नाही. तीनही पक्षांचे प्रमुख नेते याबाबत निर्णय घेतील, असेही आत्राम म्हणाले.