नागपूर: राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाचे रुग्ण वाढले, परंतु एकही मृत्यू नोंदवला गेला नव्हता. परंतु, आता नागपूर विभागात नुकत्याच झालेल्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत गडचिरोलीतील तीन रुग्णांचे मृत्यू हिवतापाने झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यात १ जानेवारी २०२४ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यानच्या काळात हिवतापाचे अडीच हजारच्या जवळपास रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक १ हजार ४१ रुग्ण बृहन्मुंबई आणि ९८३ रुग्ण गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत बृहन्मुंबई व गडचिरोली या दोन जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ८२ टक्के आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे निदान झालेले तीन रुग्ण दगावले होते. परंतु या मृत्यूला हिवतापच कारण आहे की इतर आजार हे स्पष्ट नव्हते. दरम्यान, नागपूर विभागातील मृत्यू विश्लेषण समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने गडचिरोलीतील तिन्ही रुग्णांचा मृत्यूला हिवतापच कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. या तीन मृत्यूमुळे चालू वर्षात राज्यात प्रथमच हिवतापाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा – आरटीई घोटाळा : रुखसार उर्फ रुपाली शेखसह फरार पालकाला अटक, मोठे गबाड लागणार हाती

हिवताप म्हणजे काय?

हिवताप हा परजीवीमुळे होणारा आजार आहे. हा परजीवी संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो. ज्या लोकांना हिवताप आहे त्यांना सहसा खूप ताप येतो आणि थंडी वाजते. हा रोग समशीतोष्ण हवामानात असामान्य असला तरी, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांमध्ये हिवताप अजूनही सामान्य आहे.

लक्षणे

सामान्‍यतः हिवताप आजारात थंड अवस्‍था, उष्‍ण अवस्‍था आणि घाम येण्‍याची अवस्‍था या तीन अवस्था असतात. या अवस्‍थानंतर लक्षण विरहीत अवस्‍था असून त्‍यामध्‍ये रुग्‍णाला आराम वाटू लागतो. थंड अवस्‍थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्‍यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्‍वरेने वाढत जातो, तीव्र स्‍वरुपाची डोकेदुखी आणि उलट्या होणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात. उष्‍ण अवस्‍थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्‍वचेस स्‍पर्श केल्‍यास त्‍वचा गरम व कोरडी भासते. मात्र उलट्या नाहीशा होतात. घाम येण्‍याच्या अवस्थेत भरपूर घाम येऊन ताप कमी होतो.

हेही वाचा – तिघांना चिरडणाऱ्या आरोपींचे गुन्हेगारी ‘कनेक्शन’

“मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत गडचिरोलीतील तिन्ही रुग्णाचा मृत्यू हिवतापाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्व विदर्भात यंदा अवकाळी पावसामुळे रुग्णसंख्या जास्त आहे. परंतु आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी उपायांमुळे हिवताप नियंत्रणात आहे.” – डॉ. श्याम निमगडे, सहाय्यक संचालक (हिवताप), आरोग्य सेवा, नागपूर.

हिवतापाच्या रुग्णांची स्थिती

(१ जानेवारी ते १४ एप्रिल २०२४)

जिल्हा/ महापालिका रुग्ण (२०२४) रुग्ण (२०२३)

गडचिरोली जिल्हा      –       ९८३      –       ९३०

चंद्रपूर जिल्हा       –      ०६९       –      ००७

रायगड जिल्हा       –      ०६६      –       ०४९

बृहन्मुंबई महापालिका     –        १,०४१      –       ५८७

पनवेल महापालिका       –      ०८९      –       ००५

ठाणे महापालिका      –       ०४१       –      ०८६

कल्याण महापालिका      –       ०४०      –       ०१३