लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवनई येथे उभारल्या जाणाऱ्या उपकेंद्रातील इमारतीतील जागा विद्यार्थी संख्या, संगणक कक्ष, ग्रंथालय आदी सुविधा देण्यास पुरेशी नाही. त्यामुळे इमारतीचे विस्तारीकरण होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने बांधकाम आणखी सात हजार चौरस फूटने वाढवावे, असा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याकडे सादर केला आहे.

उपकेंद्राच्या बांधकामाचा आढावा घेणारी बैठक उपकेंद्र विकास समितीचे अध्यक्ष सागर वैद्य यांच्या उपस्थितीत नाशिक उपकेंद्रात झाली. यावेळी विद्यापीठातील बांधकाम विभागातील अभियंते, प्रकल्प सल्लागार, समन्वयक, संचालक आदी उपस्थित होते. बैठकीपूर्वी सर्वांनी शिवनईतील बांधकामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

आणखी वाचा-धुळे महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले आता मोफत; महासभेत निर्णय

सध्या नाशिक उपकेंद्रातील सिडको कॅम्पसमध्ये एमबीएचे शिक्षणक्रम सुरू असून त्याची क्षमता १२० विद्यार्थी इतकी आहे. पुढील शैक्षणिक वर्षात बीबीए, संशोधन केंद्र व अन्य अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे कॅम्पसची विद्यार्थी संख्या ४०० पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे वैद्य यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणले.

नियमाप्रमाणे नव्या स्वमालकीच्या शिवनई येथील कॅम्पसमध्ये स्थलांतरित व्हायचे असेल तर विद्यापीठाला आता सुरू असलेल्या बांधकामा व्यतिरिक्त अजून वाढीव वर्ग खोल्या, संगणक कक्ष, ग्रंथालय, सभागृह, उपहारगृह आदी सुविधा लागणार आहेत. त्यासाठी आताच नियोजन करून वाढीव बांधकाम करण्याची गरज त्यांनी मांडली. याव्यतिरिक्त कॅम्पसपर्यंत जाण्यासाठी रस्ता, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशव्दाराचे काम, विद्युतीकरण, फर्निचर आदी कामांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा-मनमाड-मुंबई एक्सप्रेस पुन्हा वादात; आता दररोज धुळ्यातून सुटणार; नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये नाराजी

बैठकीनंतर वैद्य यांनी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. कुलगुरूंनी याविषयी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच विद्यापीठाच्या बांधकाम समिती आणि व्यवस्थापन परिषदेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीला विद्यापीठाचे संचालक डॉ. उमेश राऊत, समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, बांधकाम अभियंते आशिष वर्पे, रवींद्र शिरसाठ, प्रकल्प सल्लागार सौरभ महाजन, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion of pune university sub centre building is necessary sagar vaidyas proposal to the vice chancellor mrj