लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: मनमाड रेल्वे स्थानकातून आठवड्यातून तीन दिवस धावणारी मनमाड-मुंबई उन्हाळी विशेष एक्सप्रेस मनमाडहून बंद करून दररोज याच वेळेत धुळ्यावरून सोडण्यात येणार असल्याची माहिती उजेडात आली आहे. करोनाकाळापासून बंद करण्यात आलेली मनमाडकरांची हक्काची गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू न करता प्रती गोदावरी म्हणून सुरू केलेली उन्हाळी विशेष मनमाड -मुंबई एक्सप्रेस तीन दिवस मनमाड येथून तर उर्वरीत तीन दिवस धुळे येथून सोडण्यात येत होती. ही गाडी आता सर्वच दिवस धुळे येथून सोडण्याचा घाट घातला जात असल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोनाआधी मनमाडहून मुंबईसाठी धावणारी एक्सप्रेस करोनानंतर सुरु झाली. परंतु, तिची विभागणी धुळे आणि मनमाड अशी झाली. धुळेकरांकडून थेट मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी करण्यात येत होती. खासदार डाॅ. सुरेश भामरे यांनी या मागणीचा पाठपुरावा केला. परंतु, स्वतंत्र गाडीऐवजी मनमाडहून सुटणारी दादर (मुंबई) एक्सप्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धुळ्याहून सोडण्यात येऊ लागली. त्यामुळे धुळ्याहूनच एक्सप्रेस प्रवाशांनी भरुन येऊ लागल्याने मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. या समस्येवर निघालेला तोडगा समाधानकारक नसताना त्यात आता ही एक्सप्रेस दररोज धुळ्याहून सुटणार आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून लवकरच परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती खासदार भामरे यांनी धुळे येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी दिली. यामुळे मनमाडकर चाकरमान्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा… नाशिक: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक लाच प्रकरणी ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनमाड रेल्वे स्थानकातून उपरोक्त गाडीला पुरेसा महसूल मिळत नसल्याचे कारण देत रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी हा निर्णय मनमाडकरांवर अन्यायकारक ठरणार आहे. नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.