काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करीत आहेत. आता सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. सावरकरांबद्दल अपमानस्पद वक्तव्य केल्यास राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजपच्या महानगर-जिल्हा शाखेतर्फे सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ मंत्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी यातना भोगल्या, काळ्या पाण्याची शिक्षाही भोगली, त्यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार अपमान करीत आहेत. त्यांच्याविषयी खालच्या स्तरावर बोलत आहेत आणि ते आम्ही निमूटपणे सहन करतोय. यापेक्षा निर्लज्जपणाचा कळस दुसरा असूच शकत नाही. भाजपने वेळोवेळी आक्षेप घेत विरोधही केला आहे. मात्र, काही निर्लज्ज राजकारणी राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आता हे बंद झाले पाहिजे. आता पुन्हा सावरकरांबद्दल काही अपमानास्पद वक्तव्य केल्यास राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला जाणार नाही. त्यासंदर्भात तीव्र आंदोलनही करू. त्यासाठी काहीही किंमत मोजू, असे महाजन यांनी सांगितले. सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही त्यांनी दिले.

हेही वाचा >>>धुळे: महिलेच्या आत्महत्येनंतर भूखंड हडपणार्या संशयितांविरुध्द गुन्हा

शहरातील बळिरामपेठ परिसरातील भाजपच्या वसंतस्मृती या जिल्हा कार्यालयात गुरुवारी श्रीरामनवमीचे औचित्य साधून मंत्री महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, संघटन सचिव तथा नगरसेवक विशाल त्रिपाठी, भगत बालाणी, महापालिकेतील गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, ज्येष्ठ नेते सुभाष शौचे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर सदाशिव ढेकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी सचिन पानपाटील, शक्ती महाजन, मनोज भांडारकर यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More Stories onजळगावJalgaon
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan accuses congress leaders that maharashtra will not tolerate savarkar insult amy
First published on: 30-03-2023 at 14:32 IST