नाशिक: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १९७ व्या रामशेज दुर्ग संवर्धन मोहिमेत श्रमदानातून बहुतांशी कोरड्या पडलेल्या मोठ्या आकारातील गणेश तळ्यातील दगडे काढण्यात आली, गणेश तळे पूर्णपणे गाळमुक्त करण्यात आले. वणव्यांमुळे किल्ल्याचे नैसर्गिक नुकसान होत असून मोर बनातून मोर गायब झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे. अनेक मोर, वन्यजीव विस्थापित झाले असून किल्ला वणवामुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रामशेजच्या पायथ्याला किल्ल्यावर जा-ये करण्यासाठी नोंदणी कक्ष बांधावा, चिंचेसमोर प्रशस्त जागेत दुर्गसंवाद कट्ट्यासाठी गोलाकार दगडाची बैठक, किल्ल्यावर पूर्णत: प्लास्टिक बंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी करावी याबाबतची मागणी वन विभाग आणि स्थानिक उपसरपंच संदीप कापसे यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात या उमेदवारांचे अर्ज अवैध

नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने २००० पासून आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ले, पुरातन बारव, शिवकालीन तळे, कुंड, जुन्या समाधींचा जीर्णोद्धार व संवर्धन कार्य अखंडितपणे केले आहे. नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटरवरील रामशेज किल्ल्याचे श्रमदानातून अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासपूर्ण संवर्धन केले आहे. यंदा कडक उन्हामुळे पहिल्यांदाच रामशेजवरील टाके कोरडे पडले आहे. काहींचे पाणी पूर्ण तळाला गेले आहे. या कोरड्या टाक्यातील गाळ काढणीच्या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी केलेल्या श्रमदानात किल्ल्यावरील व्यावसायिकानी केलेला कचरा वेचून गणेश टाक्यातील गाळ व दगडे काढण्यात आली. एकूणच किल्ल्यावरील सर्वच टाके गाळमुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी शिवकार्य गडकोटच्या स्वखर्चाने, कष्टाने हे कामकाज अखंडित सुरु आहे. मोहिमेत संस्थेचे राम खुर्दळ, उपाध्यक्ष भूषण औटे, विश्वस्त किरण दांडगे, ललित घाडीगावकर, अक्षय भोईर, (मुंबई), ज्येष्ठ दुर्गमित्र उदय पाटील, नामदेव धुमाळ, पुरुषोत्तम पवार, अशोक पोटे, कृष्णकांत विसपुते हे उपस्थित होते.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आठ टक्क्यांवर

रामशेजसह ६० किल्ल्यांची दुरवस्था

रामशेजसह नाशिक जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षाने गडांसह येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित व मोडकळीस आला आहे. रामशेजवरील टेहळणी बुरुज, चोरखिंड, पश्चिम द्वार यांची दुरुस्ती व्हावी, यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. रामशेजच्या नैसर्गिक स्थितीला धोका आहे. काही विकृत लोकांनी लावलेल्या वणव्यांमुळे दरवर्षी किल्ल्याचे नैसर्गिक नुकसान होते. मोरबन मोरमुक्त झाले आहे, अनेक मोर, वन्यजीव विस्थापित झाले आहेत. किल्ला वणवामुक्त करावा, हतगड किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार वीर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांची समाधी अतिक्रमणमुक्त करावी, तिचा जीर्णोद्धार करावा, रण मैदानातील चिरा मुक्त करावा याकडे पुरातत्व, वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र त्याबाबतील दुर्लक्षच आहे. नाशिक जिल्ह्यातील दुर्गसंवर्धक मुख्य संस्था, जिल्हाधिकारी, तहसीलदार, राज्य पुरातत्व, वन विभागाच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत करावी, सह्याद्रीतील डोंगरफोड थांबवावी, याबाबतीत पुन्हा निवेदन दिले जाईल, असे संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी बैठकीत सांगितले.