लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: महाराष्ट्र सरकार अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देईल, तशी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांच्या भाषणातून काही मिळाले नाही, असे टिकास्त्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोडले.
येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीसाठी आलेले पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु झाल्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले. लक्षद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार फैजल यांना न्यायालयाने दिलासा देवूनही त्यांना अद्यापही पूर्ण खासदारकी बहाल झालेली नाही. तशीच परिस्थिती राहुल गांधी यांची करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू असल्याचे दिसत आहे. विधानसभेबाहेर गांधी यांच्या प्रतिमेस भाजप आमदारांनी चप्पलने मारणे ही कृती बरोबर नाही. या कृतीविषयी कारवाईची सभागृहात मागणी केली. मात्र सत्तेत बसलेले कसे वागतात हे सर्व बघत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभांना लोकांना ओढून आणावे लागत नाही. ते स्वत:हून येतात, हे त्यांच्या सभेचे वैशिष्ट्ये आहेत.
दरम्यान, पाटील यांनी शिंदे गटात असलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यातील नगरपालिका इमारतीची पाहणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.